आशिषकुमारला सुवर्ण; भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 05:58 AM2019-07-28T05:58:25+5:302019-07-28T05:58:51+5:30
या स्पर्धेत ३७ देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होेता.
नवी दिल्ली : बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत शनिवारी भारताच्या आशिष कुमारने ७५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. आशिषचे हे पहिलेच आंतरराष्टÑीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली.
या स्पर्धेत भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. या स्पर्धेत ३७ देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होेता. भारताच्या माजी ज्यु. चॅम्पियन निकहत झरीन (५१), दीपक (४९), मोहम्मद हसमुद्दीन (५६) व बृजेश यादव यांनी रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत आशिष चांगल्या फॉर्ममध्ये होता. इंडिया ओपनमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर त्याने शनिवारी कोरियाच्या किम जिनजाए याच्यावर ५-० अशी एकतर्फी मात करत आपल्या कारकिर्दीतील पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.
निकहतला आशियाई सुवर्णविजेती चांग युवान हिने चांगली लढत दिली. चीनच्या या खेळाडूने निकहतला ५-० असे पराभूत केले. निकहतने आशियाई चॅम्पियशिप व इंडिया ओपनमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
५६ किलो गटात मोहम्मद हसमुद्दीन याला थायलंडच्या चाचाई देचा बुतदी याच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर उजबेकिस्तानच्या मिर्जाखमेदोव नोदिरजोन याने दीपकला ४९ किलो वजनगटात पराभूत केले. ८१ किलो वजन गटात बृजेश यादवने आपली सर्व ताकद पणाला लावली; मात्र त्याला थायलंडच्या अनावत थोंगक्रातोक याने ४-१ असे पराभूत केले. यापूर्वी भारताच्या मंजू राणी (४८)ला थायलंडच्या चुटामाट रकसतने पराभूत केल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या आशिष (६९) व भाग्यवती काचरीने कांस्यपदक मिळविले. (वृत्तसंस्था)