जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढला आहे. आजचा दिवस आशियाई खेळासाठी अविस्मरणीय असाच आहे. कारण भारताने आज या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे. चीन हा अजूनही 205 पदकांसह अव्वल क्रमाकावर कायम आहे.
चीनची या स्पर्धेतील कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. कारण सुवर्णपदकांचे शतक पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त चार पदकांची गरज आहे. चीनने आतापर्यंत 96 सुवर्ण, 64 रौप्य आणि 45 कांस्य अशी एकूण 205 पदके आहेत. पदकतालिकेत दुसरे स्थान जपानने कायम ठेवले आहे. जपानच्या खात्यामध्ये 43 सुवर्ण, 38 रौप्य, 60 कांस्य अशी एकूण 141 पदके आहेत. पदकतालिकेत तिसरा क्रमांक दक्षिण कोरियाने पटकावला आहे. कोरियाने आतापर्यंत 32 सुवर्ण, 39 रौप्य आणि 46 कांस्य अशी एकूण 117 पदके पटकावली आहेत.
भारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचे हे पन्नासावे शतक मिश्र रिले स्पर्धेत मिळाले. 4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
कुराश या खेळप्रकारात भारताने दोन पदके पटकावली आहेत. या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पा जाधवने कांस्यपदक पटकावले आहे.
भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतासाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेतील रौप्यपदकही आपल्याला मिळाले आहे. भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
भारताच्या खात्यामध्ये एकूण 50 पदके आहेत. या 50 पदकांसह भारताने आठवे स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत 9 सुवर्णपदके पटकावली आहेत, त्याचबरोबर 19 रौप्य आणि 22 कांस्यपदके भारताच्या खात्यामध्ये आहेत.