जकार्ता - भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. त्याने पाचव्या प्रयत्नांत 20.75 मीटर गोळाफेक करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने या कामगिरीसह आशियाई विक्रमही नावावर केला. आशियाई स्पर्धेत 1951 ते आत्तापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळालेली आहेत. ती परंपरा तेजींदरपालने कायम राखली.
पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील खोसा पांडो गावात जन्मलेल्या या खेळाडूचे पहिले प्रेम क्रिकेट होते. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरपालने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. 2017च्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20.40 मीटर गोळाफेकला होता. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रतेसाठीचे 20.50 मीटर अंतर गाठता आले नाही. त्यानंतर 2017च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तूरने 19.77 मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या 0.03 मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते.