Asian Games 2018: भाऊ, वडील आणि आजोबांना तिने एका महिन्यात गमावलं, पण तरीही पटकावलं पद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 04:40 PM2018-08-31T16:40:50+5:302018-08-31T16:41:06+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धा ऐन तोंडावर आली होती. स्पर्धेपूर्वी तिने भाऊ, वडिल आणि आजोबा यांना एका महिन्यात गमावले. तिच्यावर आभाळ कोसळले होते.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : एखद्या खेळाडूसाठी जेवढी शारीरिक ताकद गरजेची असते, तेवढेच मानसीक संतुलनही. कारण मानसीक संतुलन ठिक नसले तर खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही. आशियाई स्पर्धा ऐन तोंडावर आली होती. स्पर्धेपूर्वी तिने भाऊ, वडिल आणि आजोबा यांना एका महिन्यात गमावले. तिच्यावर आभाळ कोसळले होते. या परिस्थितीतून सामान्य माणसाला बाहेर पडता येणं शक्य नव्हते. पण तिने स्वत:पेक्षा देशाचा विचार केला. आपल्या पाठीवर दु:खाचे ओझे घेऊन ती जकार्ताला गेली आणि पदक पटकावून देशाचे नाव उंचावले. ही गोष्ट आहे ती भारताच्या पिंकी बलहाराची.
पिंकी दिल्लीला राहणारी. कुराश हा खेळ ती खेळत होती. आशियाई स्पर्धेची तिची तयारी जोमात होती. पण एका महिन्यात तिने कुटुंबातील तीन व्यक्तींना गमावले. पण तरीही तिने आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले होते. पण घरातील तीन व्यक्तींचे निधन झाल्यावर ही मुलगी सराव करते, असे लोकांना समजले तर काही खरे नाही, हे तिच्या मामांनी ओळखले. त्यामुळे तिचे मामा तिला कुणालाही कळू न देता सरावाला पाठवायचे.
पिंकीने पदक जिंकावे, ही त्याच्या बाबांची इच्छा होती. पण या स्पर्धेपूर्वीच त्यांचे निधन झाले. पण आपल्या बाबांच इच्छा पूर्ण करायची, हे तिने मनोमन ठरवले. पिंकी स्पर्धेसाठी रवाना झाली. तिने पदक पटकावत वडिलांची इच्छा पूर्ण केली. पण हे पदक पाहण्यासाठी तिचे बाबा जीवंत नव्हते. जेव्हा पिंकीने पदक पटकावले तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. त्यावेळी बऱ्याच जणांना तिचे डोळे का पाणावले हे समजले नाही, पण अखेर तिच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट सांगितली.