मुंबई - आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी रोमहर्षक विजय मिळवताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आशियाई स्पर्धेपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही दोघांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे, तर विनेशही लवकरच अर्ज करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे बजरंगने पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडतो, परंतु आशियाई स्पर्धेमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
बजरंगने 65 किलो वजनी गटात जपानच्या ताकातानी दैचीचा 11-8 असा पराभव केला. महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेशने जपानच्याच ईरीक युकीचा 6-2 असा पराभव केला. आशियाई स्पर्धेतील भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.