नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णविजेते तसेच भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा देणारे बॉक्सर डिंकोसिंग यांचे गुरुवारी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. २०१७ पासून त्ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी बाबई नगानगोम तसेच एक मुलगा आणि मुलगी आहे.५४ किलोगटात(बॅंटम वेट) खेळणारे डिंको यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती, पण त्यांनी या विषाणूवर मात केली होती.तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले होते. मात्र कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून २४०० किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले.डिंकोसिंग यांनी १९९८ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. विशेष असे की आशियाई स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर त्यांना संघात घेण्यात आले. अनेक दिग्गजांना पराभवाची चव चाखवून त्यांनी सुवर्ण जिंकले. १९९८ मध्ये त्यांना अर्जुन व २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले. डिंको यांनी भारतीय नौदलात सेवा दिली.
‘डिंकोसिंग यांच्या निधनामुळे अतिशय वाईट वाटत आहे. ते भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धयांपैकी एक होते. त्यांच्या सुवर्णपदकामुळे भारतात बॉक्सिंगला ग्लॅमर लाभले. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.’ - किरेन रिजिजू, क्रीडामंत्री.
डिंको हे रॉकस्टार दिग्गज आणि योद्धा होते. मणिपूरमध्ये मी त्यांची लढत पाहण्यासाठी रांग लावून उपस्थित होते. त्यांनी मला प्रेरणा दिली. ते माझे नायक होते. त्यांच्या अकाली निधनामुळे माझे फार मोठे नुकसान झाले.’- एम. सी. मेरीकोम