बँकॉक : अमित पंघाल (५२ किलो) आणि कविंदरसिंग बिष्ट (५६ किलो) यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सलग दुसऱ्या सुवर्णपदकाकडे वाटचाल करताना अन्य सहा भारतीय खेळाडूंसह गुरुवारी येथे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपदच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.पंघाल व बिष्ट यांनी प्रभावी कामगिरी केली, पण सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठणाºया शिव थापाचे (६० किलो) आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागात पंघाल व बिष्ट यांच्या व्यतिरिक्त दीपक सिंग (४९ किलो) आणि आशिष कुमार (७५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली, तर महिला विभागात पूजा राणी (७५ किलो) आणि सिमरनजित कौर (६४ किलो) शुक्रवारी होणाºया अंतिम लढतीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या.पंघालने चीनच्या हु जियानगुआनचा पराभव केला. बिष्टने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विश्व चॅम्पियन कजाखस्तानच्या काईरात येरालिएवचा पराभव केला. त्यानंतर त्याने मंगोलियाच्या एंख-अमर खाखूला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. दरम्यान या दोन्ही बॉक्सर्सच्या डोळ्याला दुखापत झाली, पण भारतीय बॉक्सर्स ३-२ ने विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. थापाने २०१५ च्या रौप्यपदक विजेत्या कजाखस्तानच्या जाकिर सैफुलिनविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली, पण अखेरच्या फेरीमध्ये तो कमकुवत पडला आणि शेवटी खंडित निर्णयात त्याला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष विभागात आशिष (६९ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो पेक्षा अधिक) यांनी कांस्यपदक पटकावले. आशिषला उज्बेकिस्तानच्या बोबो उस्मान बातुरोवने ५-० ने पराभूत केले तर सतीशने दुखापतीमुळे कजाखस्तानच कामशिबेक कुनाकाबयेवला पुढे चाल दिली. भारतासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली. दीपकला सलग दुसऱ्यांदा वॉकओव्हर मिळाला. कजाखस्तानच्या तेमिरतास झुसुपोवने दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय चॅम्पियन थेट फायनलसाठी पात्र ठरला. आशिष कुमारने इराणच्या सेयेदशाहिन मौसावीला पुनरागमनाची संधी दिली नाही. महिलांमध्ये मनिषा तायवानच्या हुआंग सियाओ वेनविरुद्ध पराभूत झाली तर सरिताला (६० किलो) चीनच्या यांग वेनलूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. जरीनला व्हिएतनाच्या नगुयेन थी तामविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पूजाने (७५ किलो) कजाखस्तानच्या फरीजा शोलटेचा पराभव केला तर सिमरनजितने उज्बेकिस्तानच्या माफतुनाखोन मलिवाविरुद्ध ५-० ने विजय मिळवला. (वृत्तसंस्था)महिला विभागात अनुभवी एल. सरिता देवी (६० किलो), गेल्या वेळची रौप्यपदक विजेता मनिषा (५४ किलो), माजी विश्व ज्युनिअर चॅम्पियन निखत जरीन (५१ किलो) आणि विश्व रौप्यपदक विजेता सोनिया चहल (५७ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आशियाई अजिंक्यपद: भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 2:49 AM