जॉर्डन : राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा गौरव सोळंकी व आशिष कुमार यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. गौरव याने ५७ किलो वजन गटात किर्गिस्तानच्या अकिलबेक एसेनबेक उलू याला एकतर्फी सामन्यात ५-० ने पराभूत केले. आशिष कुमार याने तैवानच्या चिया वेई याच्यावर ५-० अशी मात केली.गौरवने किर्गिस्तानच्या दोनवेळच्या राष्टÑीय चॅम्पियन अकिलबेकवर सुरुवातीपासूनच दबाव आणला. त्याच्या कमकुवत बचावाचा गौरवने फायदा उठवला. पुढील फेरीत त्याचा सामना उजबेकिस्तानच्या अग्रमानांकित मिराजिजबेक मिर्जाखालिलोव याच्याशी होईल. मिर्जाखालिलोवला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. तो सध्याच्या जागतिक चॅम्पियन असून २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. आशिषचा पुढील फेरीत चौथ्या मानांकित ओमुरबेक बेखजित उलू याच्याशी सामना होईल. स्पर्धेत उपांत्यफेरीत पोहचणाऱ्या खेळाडूंना टोकियो आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे.अन्य भारतीयांमध्ये जागतिक चॅम्पियन स्पर्धेतील कास्यपदक विजेती लवलीना बोरगोहिन (६९ किलो), आशियाई चॅम्पियन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती पूजा रानी (७५ किलो), राष्ट्रकूल स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सतीश कुमार (९१ किलाहून अधिक) यांना आॅलिम्पिक पात्रतेसाठी केवळ एका विजयाची गरज आहे. (वृत्तसंस्था)
आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धा : गौरव, आशिष उप-उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:54 AM