अम्मान (जॉर्डन) : आशियाई चॅम्पियन पूजा राणी, विकास कृष्ण व लवलीना बोर्गोहेन यांनी रविवारी येथे आशियाई आॅलिम्पिक क्वालिफायर बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत धडक मारत यंदा होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.चौथ्या मानांकित राणीने (२९ वर्ष) थायलंडच्या १८ वर्षीय पोर्निपा च्युटीचा ५-० ने आणि कृष्णने तिसºया मानांकित जपानचा बॉक्सर सेवोनरेट््स ओकाजावाचा सर्वानुमते झालेल्या निर्णयाच्या आधारावर पराभव करीत आशिया/ओसियाना पात्रता स्पर्धेत पदक निश्चित केले.
राणी व पूजाने प्रथमच आॅलिम्पिक पात्रता मिळवली तर कृष्ण सलग तिसऱ्यांदा या महाकुंभासाठी पात्र ठरला. सायंकाळच्या सत्रात जागतिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती लवलीनाने उझबेकिस्तानच्या मेलिविया हिला पराभूत केले. राणी म्हणाली, ‘मी या बॉक्सरविरुद्ध खेळली नव्हती. त्यामुळे थोडी भीती होती. मी बाऊटपूर्वी आपल्या प्रशिक्षकांना याबाबत सांगितले होते. त्यांनी माझे मनोधैर्य उंचावले आणि एकतर्फी निकाल मिळविता आला. निकालामुळे मी खूश आहे. राणीला पुढच्या फेरीत विद्यमान चीनच्या जग्गजेत्या ली कियानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अव्वल मानांकित कियानने दिवसाच्या पहिल्या लढतीत मंगोलियाच्या म्यागमारजारगल मुंखबाटचा ५-० ने पराभव केला. कृष्णला गेल्या वर्षी आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या ओकाजावाविरुद्ध घाम गाळावा लागला.