शियान (चीन) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या दिव्या काकरान व मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. दिव्याने ६८ किलो गटात तर मंजू कुमारीने ५९ किलो गटातून ही कामगिरी केली.दिव्याने कास्यंपदकासाठीच्या प्ले आॅफ सामन्यात मंगोलियाच्या बाटसेतसेग सोरांंजोनबोल्ड हिला चितपट करत तिसरे स्थान पटकावले. अन्य सामन्यात मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थि हुओंग दाओ हिला ११-२ अशा गुणफरकाने पराभूत केले. भारताच्या सीमाने प्ले आॅफमध्ये प्रवेश केला होता. मात्र ५० किलो वजन गटात तिला कजागिस्तानच्या व्हेलेंटिना इवानोवना इस्लामोवा ब्रिक हिच्याकडून ५-११ असे पराभूत व्हावे लागले.तत्पूर्वी दिव्या व मंजू यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना कास्यपदकासाठी लढावे लागले. सीमाने रेपचेज जिंकल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत दिली. दुखापतीनंतर मैदानात उतरलेल्या दिव्याला उपांत्य फेरीत चीननच्या फेंग झोऊ हिच्याकडून ४-१४ असे पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत दिव्याने व्हियतनामच्या होंग थुये एनगुएनवर १०-० अशी एकतर्फी मात केली होती.मंजू कुमारीला उपांत्यफेरीत मंगोलियाच्या बाटसेतसेग अल्टानसेतसेग हिच्याकडून ६-१५ असे पराभूत व्हावे लागले. मंजूने उपांत्यपूर्वफेरीत कजागिस्तानच्या मदिना बाकरबेरजेनोव्हाला ५-३ असे पराभूत केले. सीमा पात्रता फेरीत जपानच्या युकी इरीकडून पराभूत झाली होती. मात्र रेपेजेज फेरीत तिला संधी मिळाली. ललिता व पूजा पराभूत झाल्याने ५५ व ७६ किलो गटातील भारताचे आव्हान यापूर्वीच संपले आहे. (वृत्तसंस्था)
आशियाई कुस्ती स्पर्धा: दिव्या काकरान, मंजू कुमारीला कांस्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 2:54 AM