सिडनी : रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन विश्व टूर सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने इंडोनेशियाची चोईरुनिस्सा हिच्यावर २१-१४,२१-९ असा विजय नोंदविला. सिंधू आता थायलंडच्या निचाओन जिंदापोलविरुद्ध लढेल.
सहावा मानांकित समीरने मलेशियाचा ली जी जियाचा २१-१५, १६-२१, २१-१२ असा पराभव केला. मागच्या महिन्यात सुदीरमन चषक स्पर्धेत समीर याच खेळाडूकडून पराभूत झाला होता. समीरची पुढील लढत चायनीज तायपेईचा वांग जू लेई याच्याविरुद्ध होईल. सिंगापूर ओपन चॅम्पियन बी. साईप्रणीत याने कोरियाचा ली डोंग कियून याचा २१-१६, २१-१४ ने पराभव केला. साईप्रणीतला पुढील सामना इंडोनेशियाचा अॅन्थोनी सिनिसुका याच्याविरुद्ध खेळायचा आहे.
महिला दुहेरीत पराभवपुरुष दुहेरीत भारतीय जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी यांनी आपलेच सहकारी मनू अत्री- सुमीत रेड्डी यांना २१-१२, २१-१६ ने पराभूत केले. अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांना कोरियाची जोडी बाएक हा ना- किम हाय रिन यांच्याकडून२१-१४, २१-१३ ने पराभवाचा धक्का बसला.