ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; सिंधू, समीर यांच्याकडून दमदार कामगिरीची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:52 AM2019-06-04T02:52:22+5:302019-06-04T02:52:31+5:30
सिंधूने सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडेल ती माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरूईविरुद्ध.
सिडनी : भारतीय स्टार पी.व्ही. सिंधू हिच्याकडूल्लं मंगळवारपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅटमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी अपेक्षित आहे. याशिवाय समीर वर्मा हादेखील विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने यंदा इंडिया ओपन तसेच सिंगापूर ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. पण जेतेपदापासून दूर राहिली. यंदा स्पेनची कॅरोलिना मारिन, कोरियाची सूंग जी ह्यून, चीनची बिगजिआओ आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान परतवून लावण्यात सिंधूला सातत्याने अपयश येत आहे. मागच्या सत्रात याच खेळाडूंविरुद्ध सिंधूने विजय मिळविला होता, हे विशेष.
सिंधूने सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडेल ती माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरूईविरुद्ध. उपांत्य फेरीसाठी सिंधूला ऑल इंग्लंड विजेती चेन यूफेईला नमवावे लागेल. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावरील समीरला सुरुवातीला मलेशियाचा ली जी जिया याच्याविरुद्ध खेळावे लागेल.
बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय आणि पारूपल्ली कश्यप यांच्यावरही भारतीयांची मदार विशेष असेल. यावर्षी स्वीस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या प्रणीतला पहिल्या फेरीत कोरियाचा ली डोंग कीऊन याचे, तर प्रणॉयला मलेशिया ओपनचा विजेता बलाढ्य लीन डॅनविरुद्ध खेळावे लागेल. कश्यपची सलामी थायलंडच्या खेळाडूविरुद्ध होईल.