बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:50 AM2020-04-18T11:50:11+5:302020-04-18T11:51:23+5:30
कोरोना व्हायरस देशात परसण्यामागे 'तबलिगी जमात' कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीमुळे लॉकडाऊन वाढला, असं वादग्रस्त ट्विट भारताची कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटनं केलं होतं.
कोरोना व्हायरस देशात परसण्यामागे 'तबलिगी जमात' कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीमुळे लॉकडाऊन वाढला, असं वादग्रस्त ट्विट भारताची कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटनं केलं होतं. तिच्या समर्थनात आणि विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू आहेत. पण, तिच्या या विधानानं समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगून बबिता विरोधान महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'तबलिगी जमात'शी संबंधित असलेल्या व्यक्तीनं औरंगाबाद शहर चौकातील पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.
''कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है। जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati,'' असं ट्विट तिनं 15 एप्रिलला केलं होतं. त्यानंतर तिला धमकीचे फोन, मॅसेज येऊ लागले. त्याला उत्तर देताना बबितानं 'तबलिगी जमात'च्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला.
ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.''
तिच्या या विधानाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ''बबिता फोगाटनं 2 आणि 15 एप्रिलला केलेल्या ट्विट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिनं या पोस्टमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बबिता आणि कंगना रौनातची बहीण रंगोली चांडेल यांच्याविरोधात आयपीएस कलम 153A आणि Information Technology Act नुसार तक्रार दाखल करण्यात यावी,'' अशी मागणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.