नागपूर : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने २०२८ च्या आॅलिम्पिकसाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजना सुरू केली. १२ खेळांमधील एकूण २५८ खेळाडूंना योजनेत सहभागी करून घेतले. यात २७ बॅडमिंटनपटूंचादेखील समावेश आहे. सध्याची ज्युनियर राष्टÑीय विजेती जोडी नागपूरची रितिका ठाकेर आणि मुंबईची सिमरन सिंघी यांच्या कामगिरीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. ‘लोकमत’शी बोलताना रितिकाचे वडील राहुल ठाकेर म्हणाले, ‘टॉप्स या महत्त्वाकांक्षी योजनेत २७ बॅडमिंटनपटंूचा समावेश करण्यात आला ही समाधानाची बाब आहे. त्याचवेळी साईने सध्याच्या ज्युनियर राष्टÑीय चॅम्पियन जोडीकडे डोळेझाक केली आहे. रितिका-सिमरन जोडी तीनवेळा ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्टÑीय विजेती राहिली. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही मुलींनी आयव्हरी कोस्ट आंतरराष्टÑीय, मॉरिशस आंतरराष्टÑीय आणि इजिप्त आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये दुहेरीचे जेतेपद पटकवून दिले. यादीत असलेली जोडी तनिषा क्रिस्टो आणि अदिती भट या रितिका-सिमरन यांच्या तुलनेत कमकुवत असल्याचा दावा करीत ठाकेर यांनी ज्युनियर राष्टÑीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी जोडीवर विजय नोंदवला होता,’ याची आठवण करून दिली.विश्व क्रमवारीत ९८ व्या स्थानावर असलेल्या रितिका-सिमरन यांनी सिनियर गटातही चार विजेतेपदावर नाव कोरले आहे. राहुल ठाकेर यांनी एमबीए अध्यक्ष आणि अ.भा. बॅडमिंटन महासंघाचे उपाध्यक्ष अरुण लखानी यांच्याकडे दाद मागितली आहे. लखानी यांनी बीएआय अध्यक्षांसोबत चर्चा करून क्रीडा मंत्रालयासमक्ष हे प्रकरण उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.
बॅडमिंटनपटू रितिका-सिमरन जोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:30 PM