बजरंग पुनिया, शरथ कमल, अजय ठाकूर, हरिका द्रोणावली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:00 AM2019-03-12T04:00:47+5:302019-03-12T04:01:13+5:30
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पहिल्या सत्रात ५४ व्यक्तींना केले सन्मानित
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या नामवंत व्यक्तींना सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून बजरंग पुनिया (कुस्ती), शरथ कमल (टेबल टेनिस), हरिका द्रोणावली (बुद्धिबळ) आणि अजय ठाकूर (कबड्डी) या खेळाडूंचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सोमवारी राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे पहिले सत्र पार पडले. या वेळी, एकूण ५४ नामांकितांना सन्मानित करण्यात आले. तसेच उर्वरित ५८ व्यक्तींना १६ मार्च रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल. २५ जानेवारीला एकूण ११२ पद्म विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री, तिरंदाज बोम्बायलादेवी लैश्राम आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांचाही समावेश आहे.
बजरंगची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी
बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याशिवाय त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. २०१३ साली बजरंगने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष वेधताना दिल्लीत झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी त्याने बुडापेस्ट जागतिक कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर २०१४ साली राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने रौप्य कमाई केली. २०१८ साली त्याने आपल्या कामगिरीचा आलेख उंचवताना गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला.
टेबल टेनिसपटू शरथ कमलनेही २०१८चे वर्ष गाजवले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने चार पदकांची कमाई केली. पुरुष सांघिक गटात त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, तर पुरुष दुहेरीत, पुरुष एकेरीत आणि मिश्र दुहेरीत रौप्य व कांस्यपदक जिंकले. भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरलाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. तसेच २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक खेळ करताना अजयने भारताच्या जगज्जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले होते.
महिला ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिलाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ साली झालेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत हरिकाने कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य ठरले. याआधी २०१२ आणि २०१५ सालीही हरिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय गिर्यारोहक बाचेंद्री पालला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.