पुणे : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राने हरयाणा संघावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवित स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. गंगपूर ओडिशा, कॅग आॅफ इंडिया, उत्तर प्रदेश, मुंबई या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात वरीष्ठ अ गट हॉकी स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेच्या क गटात महाराष्ट्राचा कर्णधार विशाल पिल्ले याने सामन्याच्या २० व्या मिनिटाला गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. हरयाणाच्या अर्जुन याने (३५ मि) गोल करीत संघाला १-१ बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विनित कांबळे (३९ मि), नवनीत स्वर्णकर (४२ मि) व आशिष शेट्टी (५६ मि) यांनी गोल करीत संघाची आघाडी ४-१ पर्यंत वाढविली. याच गटात उत्तर प्रदेशने तमिळनाडूचा ६-२ असा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशच्या सुनील यादवने (२, १७, ३० व ३५ मि) हॅट्ट्रिकसह चार गोल नोंदवित संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. ललित उपाध्याय (३६ मि), दीपक यादव (५० मि) यांनी गोल करीत आघाडी वाढविली. तमिळनाडूकडून एम विनोद रायर (४५ मि), व्ही. राजा (५१ मि) गोल करण्यात यशस्वी ठरले. स्पर्धेच्या ब गटात गंगपूर ओडिशाने झारखंडचा ४-२ असा पराभव केला. रोशन मिंझ (२, ५३ मि), विल्सन मिंझ (१० मि), विकास टोप्पो (५७ मि) यांनी गोल करीत ओडिशाचा विजय साकार केला. झारखंडकडून चंद्रशेखरने (१५ व २० मि) याने दोन गोल केले. याच गटात कॅग आॅफ इंडियाने भोपाळला ४-२ अशी मात दिली. कॅगकडून मोहम्मद मईमुद्दीन (६ मि), इम्रान खान (८, ३८ मि), चंदनसिंग (२७ मि) यांनी गोल करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओसफ उर रहमान (३६, ५८ मि) गोल करण्यात यशस्वी ठरले. स्पर्धेच्या ड गटात मुंबईने कर्नाटकावर २-१ ने विजय मिळविला. देवेंद्र वाल्मिकी (१७ मि), व्हिक्टो सिंग (५५ मि) यांच्या गोलच्या जोरावर मुंबईचा विजय साकार झाला. कर्नाटकाकडून प्रधान सोमन्ना (१७ मि) याने एकमेव गोल केला. रेल्वेज व फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियामधील सामना १-१ बरोबरीत सुटला.
महाराष्ट्राची हरियाणावर मात
By admin | Published: April 22, 2015 12:26 AM