गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया २०२० युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पदक जिंकताना महाराष्ट्राचा प्रत्येक खेळाडू नवी स्वप्नं घेऊन स्वगृही परतला आहे. अनेकांना या यशानंतर आंतरराष्ट्रीय स्थरावर अजून घवघवीत यश मिळवण्याची ऊर्जा मिळाली आहे, तसा निर्धारही अनेकांनी बोलून दाखवला आहे. यापैकी एक अशी खेळाडू आहे जिने आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याबरोबर देशासाठी सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे.
महाराष्ट्राची पूर्णा रावराणे असे या खेळाडूचे नाव आहे. पूर्णाने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात गोळाफेकीत सुवर्णपदक मिळविताना स्पर्धा विक्रम नोंदवला. तिने १४.५७ मीटर्सपर्यंत गोळाफेक करीत अनामिका दासने गतवर्षी नोंदविलेला १४.१० मीटर्स हा विक्रम मोडला. या विक्रमी कामगिरीनंतर 'लोकमत'ने तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिच्या प्रवासाचा एकेक पैलू उलगडला.
खेलो इंडियात सुवर्णपदक जिंकण्यासाठी पूर्णाला पाचव्या प्रयत्नाची प्रतीक्षा करावी लागली. पाचव्या प्रयत्नात पूर्णाने सर्वोत्तम कामगिरी केली. पूर्णा मूळची सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील रहिवासी असून, सध्या ती मालाड येथे हिरेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. गतवर्षी तिला रौप्यपदक मिळाले होते. तिचे वडील सुबोध हे मुष्टियोद्धे असून तिची बहीण कस्तुरी ही अडथळा शर्यतीतील खेळाडू आहे. त्यामुळे खेळाची आवड तिला लहानपणीच लागली.
मागील महिन्यात पूर्णाने ऑल इंडिया स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. दहिसर येथील VPM येथे ती सराव करते. तिने सांगितले की," घरातच खेळाडू असल्याने मीही खेळाडू बनले. माझे वडील राष्ट्रीय बॉक्सर आहेत, तर बहीण राष्ट्रीय अडथळा शर्यतीतीत धावपटू आहे. तिच्यामुळे मी या खेळाकडे वळली. मला पहिलं पदक हे गोळाफेकीत मिळालं होतं तेही वयाच्या दहाव्या वर्षी."
Motivator ताई...या क्रीडा प्रकाराला अजून हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही. याचं दु:ख पूर्णाला कधी वाटलं नाही. आपण आपल्या खेळाचा स्तर एवढा उंचावायचा की प्रसिद्धी स्वतः तुमच्याकडे येईल, असा निर्धार पूर्णाने बोलून दाखवला. "मला सर्वात जास्त कोणाकडून प्रेरणा मिळत असेल तर ती मोठ्या बहिणीकडून मिळते. ती मला नेहमी सांगते की पराभवही एन्जॉय करता आला पाहिजे. तेव्हाच यशाचं खरं महत्त्व समजते. तिची ही वाक्यं मला प्रेरणा देत राहतात. एक लक्ष्य मिळवल्यानंतर पुढील लक्ष्य निश्चित कर, हे ती मला सतत सांगते. स्वतःच्या कामगिरीवर बंधनं घालून घेऊ नकोस, हा तिनं शिकवलेला सिंपलफंडा आहे," असे पूर्णाने सांगितले.
वडील गुरू अन् आई डायटिशन... पूर्णा सध्यी भारतीय क्रमवारीत टॉप टेनमध्ये आहे. त्यामुळे त्यात टॉप टूमध्ये येण्याचं तिचं स्वप्न आहे. "हा क्रीडा प्रकार खूप तांत्रिक आहे आणि ते कधी कधी समजून घेण्यात अडचण होते. पण पप्पा सोप्या भाषेत ते समजावून सांगतात. त्यामुळे खूप फायदा होतो. आई माझ्या जेवणाच्या पथ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असते. ती माझी डायटिशन आहे," असे पूर्णाने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्याबरोबर भारतीय नौदलात दाखल होण्याचं पूर्णाचं स्वप्न आहे. तिच्या या स्वप्नांना 'लोकमत'कडून शुभेच्छा...