दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 07:43 PM2019-12-03T19:43:01+5:302019-12-03T19:43:36+5:30

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला.

Both teams of India in the final of the South Asian kho-kho tournament | दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

Next

काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे सुरू आहेत. आज भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचे सामने सहज जिंकल्याने उद्या पुरुषांमध्ये भारत वि. बांगलादेश तर महिलांमध्ये भारत वि. नेपाळ अंतिम फेरीत लढत देणार आहेत. मुंबई व भारताचा आघाडीचा खेळाडू श्रेयस राऊळ याने उद्याच्या अंतिम सामन्यात आम्ही आक्रमक रणनीती आखणार असल्याचे सांगून सुवर्णपदक भारतच जिंकेल असे स्पष्ट केले आहे.    

आज झालेल्या सकाळच्या सत्रातील पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलं. भारताने संरक्षणासाठी श्रेयस राऊळ, बी. राजू व सुरेश सावंत यांना मैदानात उतरवले. श्रीलंकेचे खेळाडूंनी सर्वप्रथम श्रेयस राऊळचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि श्रेयस राऊळने उत्कृष्ट खेळाची झलक दाखवताना दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केलं त्याला श्रीलंकेच्या रनथंगाने सूर मारत बाद करताना प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या. त्यानंतर लंकेने बी. राजूचा पाठलाग सुरू केला. त्याने छान हुलकावण्या देत, साखळी पद्धतीने खेळत तब्बल तीन मिनिट तीस सेकंद वैयक्तिक वेळ नोंदवत बाद झाला. राजूलासुद्धा लंकेच्या रनथंगानेच बाद केले. त्यानंतर मात्र सुरेश सावंतला काही कमाल दाखवता आली नाही. लंकेच्या एम व्ही धनंजयने सुंदर सूर मारत अवघ्या वीस सेकंदात त्याला बाद केलं. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत अधिक पडझड होऊ दिली नाही मात्र तो शेवटची वीस सेकंद असताना सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर मात्र सागर पोद्दार नाबाद राहिला.

यानंतर भारताने केलेल्या आक्रमणात श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही मात्र भारताच्या अभिनंदन पाटीलने सात खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला तर श्रेयस राऊळने चार खेळाडूंना बाद केले तर सागर पोद्दार व दीपक माधवने प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करून भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशाची दारे उघडली. दुसऱ्या डावात भारताचा जगदेव सिंग एक मिनिट संरक्षण करून लवकर बाद झाला झाला. त्यानंतर मुनीर बाशाने किल्ला लढताना तीन मिनिटे संरक्षण करत श्रीलंकेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. मात्र तो श्रीलंकेच्या मधुशानकडून सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर भारताच्या एम. सिबीनने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करत भारताचा विजय सुकर केला त्याला उत्कृष्ट साथ देताना धानवीन खोपकरने दोन मिनिटे संरक्षण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 25-01 असा एक डाव चोवीस गुणांनी धुव्वा उडवत सहज अंतिम फेरी गाठली. या सामन्यात भारताच्या पोर्णिमा सकपाळने, कृष्णा यादव व निकिता पवार यां संरक्षणासाठी मैदानात उतरल्या त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी पूर्णिमा सकपाळचा पाठलाग करताना तिची दमछाक करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही खेळाडूला तिने दाद न देता तब्बल साडे चार मिनिटे संरक्षण करत भारताचा विजयी दावा मजबूत केला. त्यानंतर लंकेच्या खेळाडूंनी कृष्णा यादवचा पाठलाग सुरू केला मात्र तिने बहारदार संरक्षण करताना डावाच्या शेवटी म्हणजेच वैयक्तिक नाबाद साडेचार मिनीटांची वेळ नोंदवली.  यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणात काजल भोरने तब्बल सात खेळाडूंना बाद करून भारताचे विजयात मोठा वाटा उचलला व तिला उत्कृष्ट साथ देताना सस्मिता शर्मा, परवीन निशा , ऐश्वर्या सावंत व इशिता बिश्वास यांनी प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करून अंतिम फेरीत पोहोचले.


पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने नेपाळचा 24-23 (9-8,8-9 व 7-6) असा ज्यादा डावात एक मिनिट राखून एक गुणाने विजय साजरा केला. हा सामना बरोबरीत (17-17) सुटल्यामुळे जादा डाव खेळविण्यात आला व या डावात बांगलादेशने कमालीचा खेळ उंचावत 07-06  असा एक मिनिट राखून आपल्या अप्रतिम विजयाची नोंद केली व अंतिम फेरी गाठली.

तर महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान नेपाळने  बांगलादेशवर 07-06 असा एक डाव राखून एक गुणाने दणदणीत विजय साजरा करत अंतिम फेरी गाठली.

Web Title: Both teams of India in the final of the South Asian kho-kho tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.