महाराष्ट्र, कोल्हापूरचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:39 AM2019-12-30T02:39:21+5:302019-12-30T02:39:24+5:30
५३ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र ,कोल्हापूर यांच्या दोन्ही संघांनी पुरुष व महिला गटाची उपांत्य फेरी गाठली
रायपूर (छत्तीसगड) : येथे सुरू असलेल्या ५३ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र ,कोल्हापूर यांच्या दोन्ही संघांनी पुरुष व महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी, जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या बलाढ्य कर्नाटकच्या दोन्ही संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
पुरुष गटात गतविजेत्या महाराष्टÑाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत पश्चिम बंगालचा १५-८ अशा गुणांनी पराभव केला. महाराष्टÑाच्या प्रतिक वाईकर याने तीन मिनिटे व ४० सेंकद बचाव केला. तर एसए अरुण याने केरळच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने तीन मिनिटे ४० सेकंद बचाव करत ४ बळीही मिळवले. त्याचवेळी, केरळने स्पर्धेतील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. केरळने बलाढ्य कर्नाटकवर १७-११ असा अनपेक्षित विजय नोंदवत दिमाखात आगेकूच केली. सोमवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत महाराष्टÑ कोल्हापूरविरुद्ध, तर केरळ रेल्वेविरुद्ध खेळतील. कोल्हापूरने आंध्रप्रदेशवर २२-१० असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रेल्वेने विदर्भला १३-९ असे पराभूत केले.
महिलांमध्ये महाराष्टÑ व ओडिशा यांनी उपांत्य फेरी निश्चित केली. महाराष्टÑाने हरयाणाचा १४-८ असा धुव्वा उडवला. ओडिसाने केरळवर ११-९ अशी मात करत आगेकूच केली. उपांत्य फेरीत महाराष्टÑाला कोल्हापूरशी, तर ओडिशाला एअरपोर्ट अॅथोरिटीशी दोन हात करावे लागेल. कोल्हापूरच्या महिलांना दिल्लीविरुद्ध संघर्ष करावा लागला. श्रृृष्टी शिंदे व करिष्मा रिकीबदार यांच्या जोरावर त्यांनी दिल्लीला ११-१० असे एका गुणांनी नमवले.