दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:35 PM2019-12-02T18:35:16+5:302019-12-02T18:35:31+5:30
आज सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-05 असा एक डाव बारा गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला.
काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे सुरू आहेत. सुरवातीला सुपर लीग पध्दतीने सुरू असलेले सामने अंतिम टप्यात असून उद्या उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. भारताने श्रीलंका व नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला असून सलग दुसर्या सुवर्ण पदकाकडे वाटचाल सुरू असल्याचे कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने सगीतले.
आज सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-05 असा एक डाव बारा गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात भारताच्या दिपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे तीस सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, तपन पालने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले तर सागर पोद्दार व अक्षय गणपुलेने संरक्षण करताना प्रत्येकी तीन-तीन मिनिटांचा पळतीचा खेळ करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर नेपाळच्या बुद्धकुमार थापाने व मिलन रायने चांगला खेळ केला. मात्र ते आपल्या संघाला मोठ्या परवापासून वाचू शकले नाहीत.
महिलांच्या सुपर लीग पद्धतीने झालेल्या सामन्यात भारताने नेपाळवर 11-03 असा एक डाव आठ गुणांनी मोठा विजय साजरा केला. भारताच्या पहिल्या डावात मुकेश तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून बाद झाली त्यानंतर प्रियंका भोपीने संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेत नाबाद पाच मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. दुसऱ्या डावात अपेक्षा सुताराने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात एक खेळाडू बात केला त्यानंतर कृष्णा यादव ने संरक्षण करताना दोन मिनिटे चाळीस सेकंद पळतीचा खेळ केला व शेवटी ऐश्वर्या सावंतने नाबाद खेळी करताना तीन मिनिटे वीस सेकंद रक्षण केलं. या सामन्यात कर्णधार नसरीनने चार खेळाडूंना बाद करून भारतासाठी मोठा विजय निश्चित केला. या सामन्यात पौर्णिमा सकपाळ, सस्मिता शर्मा व काजल भोरने आक्रमणात प्रत्येकी दोन दोन खेळाडू बाद केले. तर पराभूत नेपाळच्या अंजली थापाने संरक्षण करताना दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद पळतीचा खेळ केला, त्यांच्याच बी. के. दिपाने संरक्षण करताना एक मिनिट वीस सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले. मात्र इतर खेळाडूंची त्यांना योग्य साथ न मिळाल्याने नेपाळला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 13-07 असा एक डाव सहा गुणांनी दणदणीत पराभव केला तर महिलांच्या सामन्यात बांगलादेशने नेपाळवर 14-09 असा एक डाव पाच गुणांनी मोठा विजय मिळवला.