कॅरम : विकास, गिरीश, झहिद, निलम, मिताली यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 04:49 PM2020-02-15T16:49:16+5:302020-02-15T16:49:48+5:30
विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अग्रमानांकित मुंबई जिल्हा विजेता आयकर विभागाचा प्रफुल्ल मोरेला २५-१९, २५-१५ असा पराभवाचा धक्का देत आपली आगेकूच कायम ठेवली.
मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अग्रमानांकित मुंबई जिल्हा विजेता आयकर विभागाचा प्रफुल्ल मोरेला २५-१९, २५-१५ असा पराभवाचा धक्का देत आपली आगेकूच कायम ठेवली.
एअर इंडियाच्या झहिद अहमदने अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या सामन्यात तिसरा मानांकित वरळी स्पोर्टस् क्लबच्या फ्रान्सिस फर्नांडीसचे २५-८, ८-२५, २५-५ असे कडवे आव्हान संपुष्टात आणले. एस. एस. ग्रुपच्या सिद्धांत वाडवळकरने उत्कंठापूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत एस. एस. ग्रुपच्याच अभिषेक भारतीला २५-१४, ६-२५, २५-१७ असे निष्प्रभ करत आगेकूच केली. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीय व जागतिक विजेता प्रशांत मोरेने सरळ दोन गेममध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिलीप सोसावर २५-२, २५-६ असा सहज विजय मिळवित उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. जैन इरिगेशनचा माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेने वरळी स्पोर्टस् क्लबच्या सलमान खानचा सरळ दोन गेममध्ये २५-५, २५-१७ असा धुव्वा उडविला. राष्ट्रीय उपविजेता एअर इंडियाच्या संदिप दिवेने सरळ दोन गेममध्ये डी. के. सी. सी.च्या निरज कांबळेचा २५-७, २५-१ असा फाडशा पाडला. स्कॉर्पियन क्लबच्या महेश सोलंकीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिनेश केदारचे ५-१२, २५-७ असे आव्हान संपुष्टात आणले. तत्पूर्वी झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात एस. एस. ग्रुपच्या अभिषेक भारतीने अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत शिवताराच्या राहुल सोलंकीची २५-८, १२-२५, २५-७ अशी कडवी झुंज मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध केले.
महिला एकेरीच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात एस. एस. ग्रुपच्या युवा राष्ट्रीय विजेती मैत्रेयी गोगटेने तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत आयुर्विमा महामंडळाच्या अंजली सिरीपुरमचा २०-२५, २५-५, २५-७ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या एका सामन्यात जैन इरिगेशनच्या मिताली पिंपळेने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तीन गेम रंगलेल्या लढतीत माजी राज्य विजेती आयर्विमा महामंडळाच्या शिल्पा पलनीटकरची २५-६, १४-२५, २५-५ अशी कडवी झुंज मोडीत काढली. रिझर्व्ह बँकेची चौथी मानांकित माजी ज्युनिअर राष्ट्रीय विजेती उर्मिला शेंडगेने ११ वर्षाच्या सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू महाराषट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेजल लोखंडेचा २५-११, ६-२५, २५-४ असे आव्हान संपुष्टात आणले. अग्रमानांकित जैन इरिगेशनच्या निलम घोडकेने तीन गेम रंगलेल्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्या शुभदा नागावकरला २५-२, १५-२५, २५-११ असे निष्प्रभ करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत आतापर्यंत १० ब्रेक टू फिनिश आणि ५ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.