कॅरम : झैद अहमद - काजल कुमारी विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:57 PM2019-01-29T20:57:53+5:302019-01-29T20:58:41+5:30
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले.
मुंबई : प्रदीप जाधव यांच्या समरणार्थ आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा मंडळ पुरस्कृत व इंडियन ऑईल सहपुरस्कृत २८ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑईलचा काजल कुमारीने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला १५-९, २५-० अशी सहज मात करत महिला गटाचे विजेतेपद मिळविले. तर पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत युनाइटेड इंडियाच्या रवींद्र बच्चलवारने ओरिएंटल इन्शुरन्सच्या गणेश पाटणकरवर २५-१४,२५-५ अशी सहज मात करून विजेतेपदाला गवसणी घातली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय कॅरम महासंघाचे असोसिएट उपाध्यक्ष शांताराम गोसावी, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वरिष्ठ व्यापार सहयोगी डॉ स्नेहा परब, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक पाटील, मानद सरचिटणीस यतीन ठाकूर, खजिनदार अरुण केदार व आंतर राष्ट्रीय पंच जनार्धन संगम यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.