कॅरम : प्रशांत मोरे, अनिल चोरगे, आविष्कार मोहिते व सेजल लोखंडे यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:42 PM2020-02-13T20:42:36+5:302020-02-13T20:43:35+5:30
तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली.
मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली.
दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात विजय कॅरम क्लबच्या संजय कांबळेने डी. के. सी. सी. च्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सार्थक नागावकरची २५-४, ११-२५, २५-११ असा कडवा प्रतिकार मोडीत काढला. आर्युविमा महामंडळाच्या अनिल चोरगेने संघर्षपूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत ९-२५, २५-१८, २५-१८ असा सचिवालय जिमखान्याच्या संजय वारंगवर विजय मिळवित स्पर्धेतला तिसरा ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.
राष्ट्रीय विश्व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने सरळ दोन गेममध्ये वालपखाडी क्लबच्या हिंमत राठोडचा २५-१८, २५-९ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. ए. के. फाऊंडेशनच्या अमन जैनने तीन गेम रंगलेल्या लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दत्ता विनेरकरवर २५-१, ११-२५, २५-० असा विजय मिळवित चौथी फेरी गाठली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिलीप सोसाने बोरिचा स्पोर्टस् क्लबच्या भूषण पाटीलचा २५-१७, २५-० असा फाडशा पाडीत कूच केली. शिवताराच्या विवेक भारतीने दोन गेम रंगलेल्या लढतीत ए. के. फाऊंडेशनच्या रुपेश जाधववर २५-५, २५-६ असा सहज विजय नोंदवित कूच केली. दुसऱ्या एका सामन्यात माजी राज्य विजेता दिलेश खेडेकरने टाटा स्पोर्टस् क्लबच्या ललित वरळीकरचा २५-२, २५-२ असा फाडशा पाडत विजयी आगेकूच केली.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सेजल लोखंडेने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अनुभवी वैभवी शेवाळेचा २५-१२, २५-११ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करताना पहिल्या गेममध्ये ब्रेक टू फिनिश करण्याचा मान मिळविला. दुसऱ्या एका सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या रोझिना गोडॅडने एस. एस. ग्रुपच्या मानसी शिंदेचा तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-१६, ९-२५, २५-४ अशी कडवी झुंज मोडीत काढून आगेकूच केली.
या स्पर्धेत आतापर्यंत ४ ब्रेक टू फिनिश आणि ३ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.