क्रि. प्र. : को-ऑपरेटिव्ह बँक एम्ल्पॉईज युनियन तर्फे आयोजित ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँक लिमिटेड तर्फे पुरस्कृत आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेत वैश्य सहकारी बँकेच्या संतोष शेरेने तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत जनकल्याण सहकारी बँकेच्या भार्गव धारगळकरची २५-७, ५-२५, २५-१० अशी झुंज मोडीत काढत चौथी फेरी गाठली. मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सत्तू कांबळेने नवोदित अपना सहकारी बँकेच्या गितेश कोरगावकरवर ६-२५, २५-५, २५-०अशी तीन गेममध्ये मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. कपोल बँकेच्या दिपक पुत्रनने तीन गेम रंगलेल्या लढतीत वैश्य सहकारी बँकेच्या विशाल सावंतचा ०-२५, २५-१०, २५-३ असा पराभव करत आगेकूच कायम ठेवली. ही स्पर्धा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे ऑफिस, शालिनी पॅलेस, दादर, मुंबई येथे अध्यक्ष माननीय खासदार श्री. आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी व सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत, खजिनदार श्री. प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात येत आहे.
म्युनिसिपल बँकेच्या राहुल पडेलकरने सरळ दोन गेममध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या विनायक आंगणेचा २५-३, २५-० असा धुव्वा उडवित आगेकूच केली. रत्नागिरीच्या दत्ताराम नार्वेकरने एन.के.जी.एस.बी. बँकेच्या प्रकाश फणसेला सरळ दोन गेममध्ये २५-०, २५-९ अशी धुळ चारली. वैश्य सहकारी बँकेच्या अनिल पात्रेने तीन गेम रंगलेल्या रंगतदार सामन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अमोल कदमला ४-२५, २५-०, २५-० असे नमवून विजयी वाटचाल कायम ठेवली. अग्रमानांकित अपना सहकारी बँकेच्या मंदार भरतावने अपना सहकारी बँकेच्याच प्रियेश पाठकला २५-०, २५-४ असे नमवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वैदेही देशमुखने सरळ दोन गेममध्ये एन.के.जी.एस.बी. बँकेच्या मनाली शानभागला २५-५, २५-५ असे नमवित तिसरी फेरी गाठली. अपना सहकारी बँकेच्या गौरी कोरगावकरने कपोल बँकेच्या स्वरुपा ठाकूरला २५-१, २५-२ असे सरळ दोन गेममध्ये निष्प्रभ केले. म्युनिसिपल बँकेच्या मानसी पाटीलने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात एन.के.जी.एस.बी. बँकेच्या वैशाली राऊतचा २५-०, २५-१ असा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली.
महिला दुहेरी गटाच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात म्युनिसिपल बँकेच्या मानसी पाटील / संगीता बेंबडे यांनी कपोल बँकेच्या कविता देसाई / स्वरुपा ठाकूर यांच्यावर २५-१, २५-३ अशी सहज मात करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात कोंकण मर्कंटाईल बँकेच्या कनिझ काजी / शकिल शेख यांनी एन.के.जी.एस.बी. बँकेच्या आशा वागळे / मानसी धनावडे यांना २५-३, २५-५ असे निष्प्रभ करत आगेकूच केली. अपना सहकारी बँकेच्या साक्षी सरफरे / प्रज्ञा आणेराव यांनी सरळ दोन गेममध्ये एन.के.जी.एस.बी. बँकेच्या मनाली शानभाग / वृषाली राऊत यांना २५-५, २५-६ असे नमवून कूच केली.
पुरुष दुहेरी गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात म्युनिसिपल बँकेच्या रवि गायकवाड / कल्याणजी परमार यांनी रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत वैश्य सहकारी बँकेच्या अरविंद गांगण / संतोष शेरे यांना २५-०, ७-२५, २५-२ असे नमवून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या एका सामन्यात अपना सहकारी बँकेच्या महादेव जावीर / संतोष कदम यांनी कपोल बँकेच्या नितीन शहा / दिपक पुत्रन यांचा २५-६, २५-४ असा धुव्वा उडवित आगेकूच केली. दुसऱ्या एका सामन्यात एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संदेश चव्हाण / संदेश तावडे यांनी सिटी बँकेच्या शिशिर खडपे / मिलिंद मेळेकर यांचा २५-५, २५-५ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून पुढची फेरी गाठली. चेंबूर नागरिक सहकारी बँकेच्या सुमीत साटम / शैलेश सावंत यांनी कपोल बँकेच्या विनायक पाटील / दिनेश जैयस्वाल यांना २५-०, २५-४ असे नमवून तिसरी फेरी गाठली. ग्रेटर बँकेच्या राजेश देसाई / शैलेश करपे यांनी तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत म्युनिसिपल बँकेच्या राजीव कांबळे / कांजी सोलंकी यांची ७-२५, २५-०, २५-१ अशी झुंज मोडीत काढली.