मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात एअर इंडियाच्या राष्ट्रीय उपविजेता संदिप दिवेने एकतर्फी झालेल्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारत कोळीवर २५-४, २५-३ असा विजय मिळविताना दोन ब्रेक टू फिनिशची नोंद करून हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात तिसरा मानांकित वरळी स्पोर्टस् क्लबच्या फ्रान्सिस फर्नांडीसला शिवताराच्या विवेक भारतीवर विजय मिळविताना ५-२५, २५-१५, २५-१८अशी कडवी झुंज द्यावी लागली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिलीप सोसाने दोन गेम रंगलेल्या लढतीत तिसरा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेचा २५-२३, २५-१० असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवली. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.
अग्रमानांकित आयकर विभागाच्या प्रफुल्ल मोरेने सरळ दोन गेममध्ये विजय कॅरम क्लबच्या लियाकत नागरजीचा २५-९, २५-१२ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. वरळी स्पोर्टस् क्लबच्या ऋषिकेश वाल्मिकीने तीन गेम रंगलेल्या लढतीत बेस्टच्या निलेश परबला २५-०, ७-२५, २५-९ असे निष्प्रभ करत आगेकूच केली. जागतिक व राष्ट्रीय विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने डी. जी. ए. च्या दिलीप काळेचा सरळ दोन गेममध्ये २५-४, २५-११ असा फाडशा पाडला.
बोरिचा स्पोर्टस् क्लबच्या जितेंद्र राठोडने तीन गेम रंगलेल्या लढतीत डी. जी. ए. च्या जितेंद्र काळेचा २५-१५, ७-२५, २५-१२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित पाचवी फेरी गाठली. वरळी स्पोर्टस् क्लबच्या सलमान खानने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजेश खेडेकरचा २५-१, ८-२५, २५-८ असा विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले.
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सबज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू सेजल लोखंडेने आपली विजयी आगेकूच कायम ठेवत आयुर्विमा महामंडळाची ज्युनिअर राष्ट्रीय विजेती मानसी कदमचा २५-१४, २५-१७ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
दुसऱ्या एका सामन्यात माजी युवा राष्ट्रीय विजेती एस. एस. ग्रुपच्या मैत्रेयी गोगटेने दोन गेम रंगलेल्या लढतीत दुसरी मानांकित माजी राष्ट्रीय व राज्य विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरचा २५-१३, २५-१२ असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवली.
या स्पर्धेत आतापर्यंत ७ ब्रेक टू फिनिश आणि ३ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.