बुद्धिबळ : नूबेर शाहला नमवून बेलारूसचा अलेक्सेज आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 09:25 PM2019-06-12T21:25:59+5:302019-06-12T21:27:47+5:30
बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यामधील साखळी सामना ६ तासांच्या विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत संपला.
मुंबई : महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मास्टर नूबेरशाह शेखचा (इलो २४३६) सहावा मानांकित बेलारूसचा ग्रँड मास्टर अलेक्सन्ड्रोव अलेक्सेजने (इलो २५८८) ३३ चालीत पराभव केला आणि १२ व्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय मानांकन अ विभाग बुद्धिबळ स्पर्धेत साखळी ५ गुणासह एकमेव आघाडी घेतली आहे. परिणामी स्पर्धेत अप्रतिम खेळ करणाऱ्या मुंबईच्या नूबेर शाह शेखची विजयीदौड पाचव्या साखळी फेरीत थबकली. बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यामधील साखळी सामना ६ तासांच्या विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत संपला.
बीकेसी येथे सुरु असलेल्या स्पर्धेमधील पहिल्या पटावर आंतरराष्ट्रीय मास्टर नूबेर शाह शेख विरुद्ध बेलारूसचा अलेक्सन्ड्रोव अलेक्सेज यामधील लढत एकतर्फी करण्यात अलेक्सेजचे डावपेच यशस्वी ठरले. क्वीन गँबित डिक्लाईंड पद्धतीने सुरु झालेल्या डावात अलेक्सेजने सुरवातीपासूनच वर्चस्व मिळविले. डावाच्या मध्यातही एकापेक्षा एक उत्तम चाली रचून त्याने सर्व चाहत्यांची वाहवा मिळवली. २३ व्या चालीला नूबेरने केलेल्या वजिराच्या चुकीच्या चालीचा त्याने पुरेपूर फायदा उठविला. हत्तीची सुयोग्य चाल करून डावावरची पकड अलेक्सेजने अधिक मजबूत केली. आपल्यावर झालेल्या आक्रमणावर बचावाचा कोणताही मार्ग न सापडल्याने शेवटी ३३ व्या चालीत नूबेरने पराभव मान्य केला. तसेच अनुभवी अलेक्सेजने डावानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्या चुका मैत्रीपूर्ण रीतीने दाखवत उत्कृष्ठ खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यांचा सामना दुसऱ्या पटावर विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत सुटला.किंग्स इंडियन बचाव पद्धतीने सुरु झालेला हा सामना तब्बल ६ तास चालला.