बुध्दिबळ : कौस्तव चक्रवर्ती ठरला विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:27 PM2019-06-13T23:27:33+5:302019-06-13T23:29:00+5:30
पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व व्हिनस चेस अकादमी आयोजित १२ व्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमधील ब विभागात १४ व्या मानांकित पश्चिम बंगालचा कौस्तव चक्रवर्तीने (इलो १९०६) साखळी ८.५ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले. दहावा मानांकित कर्नाटकच्या शरण रावचे (इलो १९३१ ) देखील साखळी८.५ गुणच झाले होते. परंतु टायब्रेकरवर कौस्तव सरस ठरल्याने शरणला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ७२वा मानांकित तामिळनाडूचा के. गोकुलराज (इलो १६४८), ३५वा मानांकित महाराष्ट्राचा हर्षल पाटील (इलो १८०९ ), द्वितीय मानांकित आंध्र प्रदेशचा अजय मुशिणी (इलो १९७७) व १०५वा मानांकित तामिळनाडूचा आर. शाम (इलो १५६५) यांचे प्रत्येकी साखळी ८ गुण झाले. परंतु टायब्रेकरनुसार गोकुलराजला तिसरा, हर्षलला चौथा, अजयला पाचवा तर शामला सहावा क्रमांक व पुरस्कार मिळाला.
बांद्रा कुर्ला संकुलातील माऊंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनल सभागृहात स्पर्धेमधील अग्रमानांकित बुध्दिबळपटूना मागे टाकत कौस्तव चक्रवर्तीआणि के. गोकुलराज यांनी नवव्या साखळी फेरी अखेर सर्वाधिक ८ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली होती. त्यामुळे विजेतेपदाची दावेदारी सिद्ध करण्यासाठी निर्णायक दहाव्या साखळी फेरीत दोघे अग्रेसर होते. निर्णायक दहाव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर कौस्तव चक्रवर्ती विरुद्ध खेळतांना मुशींणी अजयने आपला डाव २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवून गोकुलराजला जेतेपद मिळविण्याची सुवर्णसंधी दिली होती. परंतु दुसऱ्या पटावर शरण रावने गोकुलराजचा धक्कादायक पराभव करून कौस्तवला विजेतेपदाची माळ घातली.
पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला. दुसऱ्या पटावर पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गोकुलराजने शरण राव विरुद्ध इंग्लिश ओपनिंग पद्धतीचा अवलंब केला. परंतु सरस इलो रेटिंग गुण असलेल्या शरण समोर गोकुळराजचा टिकाव लागला नाही. शरणने त्याला ३६ चालीत पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.