बुद्धिबळ : ब्लित्झमध्ये भक्ती कुलकर्णी चा विक्रम; राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 08:01 PM2019-05-29T20:01:58+5:302019-05-29T20:02:52+5:30
पदकविजेत्या पुरुषांमध्ये पहिल्यांदाच महिला खेळाडू
पणजी : गोव्याची ‘गोल्डन गर्ल’ भक्ती कुलकर्णी हिने सातत्यपूर्ण कामगिरी करीत विविध स्पर्धा जिंकल्या. मात्र, जालंदर (पंजाब) येथे झालेली राष्ट्रीय ब्लित्झ बुद्धिबळ स्पर्धा भक्तीसाठी खास ठरली. ब्लित्झ या प्रकारात आतापर्यंत ओपन गटात एकाही महिला खेळाडूला पदक मिळवता आले नव्हते. राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या गोव्याच्या भक्तीने कांस्यपदक पटकावीत ही किमया साधली.
भक्ती राष्ट्रीय विजेता ग्रॅण्डमास्टर अरविंद चिदंबरम आणि ग्रॅण्डमास्टर आर.आर. लक्ष्मण यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर राहिली.
राष्ट्रीय ब्लित्झ स्पर्धेच्या एक दिवसापूर्वी भक्तीने राष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतही तिसरे स्थान मिळवले होते.या स्पर्धेत भक्तीने ग्रॅण्डमास्टर श्रीराम झा आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिनेश कुमार यांचा पराभव केला होता. राष्ट्रीय ब्लित्झ स्पर्धेतील निकाल हा भक्तीच्या कामगिरीतील सुधारणेचा एक मोठा पुरावा ठरला. या स्पर्धेत तिने भारताला नव्यानेच मिळालेल्या ग्रॅण्डमास्टर स्वयम मिश्रा, आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल शेट्टी, महिला ग्रॅण्डमास्टर मिनिक्षी, महिला ग्रॅण्डमास्टर स्वाती घाटे यांचा पराभव केला. अंतिम फेरीत तिने विजेत्या अरविंद याला बरोबरीवर रोखले. आता भक्ती ही बुद्धिबळातील तिन्ही प्रकारांत भारतातील अव्वल महिला खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाली आहे. तिने क्लासिकल, रॅपिड आणि ब्लित्झ या प्रकारातही शानदार प्रदर्शन केले आहे. या स्पर्धेनंतर ती विश्व रॅपिड आणि ब्लित्झ स्पर्धेत भारतातचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होईल. क्लासिकल प्रकारात होणाºया विश्वचषकासाठी भक्तीने आपले नाव यापूर्वीच निश्चित केले आहे.
या प्रदर्शनानंतर भक्ती खूप उत्साही आहे. तिने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, ब्लित्झ या प्रकारात ओपन गटात पुरुषांच्या सोबत खेळणे आणि पदक मिळवणे हे भारतीय बुद्धिबळात कधी घडले नव्हते. ही कामगिरी मी करू शकले याचे अप्रुप वाटते. खूप वेगळा आणि आनंददायी असा हा अनुभव होता. दुसरीकडे, बुद्धिबळ संघटनेकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.