बुध्दिबळ: सोहम शेटे, राशी चौहान, मोनीक शाह विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 07:46 PM2018-06-02T19:46:04+5:302018-06-02T19:46:04+5:30
९ वर्षाखालील गटात सोलापूरच्या सोहम शेटेने, ११ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या राशी चौहानने तर १३ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या मोनीक शाहने विजेतेपद पटकाविले.
मुंबई : क्रीडाप्रेमी दशरथ चव्हाण स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील ९ वर्षाखालील गटात सोलापूरच्या सोहम शेटेने, ११ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या राशी चौहानने तर १३ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या मोनीक शाहने विजेतेपद पटकाविले. आयडियल चेस क्लब-अकॅडमीतर्फे आरएमएमएस, मुंबई शहर बुध्दिबळ संघटना व स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन यांच्या सहकार्याने आयोजित शालेय बुध्दिबळ स्पर्धेमध्ये मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ६४ खेळाडू सहभागी झाले होते.
विजेतेपदाचा दशरथ चव्हाण स्मृती चषक ९ वर्षाखालील गटात पटकाविताना बार्शी-सोलापूरच्या सोहम शेटेने पाचव्या साखळी सामन्यात आयुष राणेची विजयीदौड संपुष्टात आणली आणि सोहमने अपराजित राहून पाचव्या गुणांसह निर्विवाद अजिंक्यपद पटकविले. या गटात सोहम शेटेने (५ गुण) प्रथम, आयुष राणेने (४.१६ गुण) द्वितीय तर आरव शाहने (४.१५ गुण) तृतीय क्रमांक पटकविला. ११ वर्षाखालील गटात राशी चौहानने निर्णायक पाचव्या लढतीत आक्रमक खेळ करून गुरु प्रकाशच्या (३ गुण) राजाला जेरीस आणले आणि सर्वाधिक साखळी ४.५ गुण नोंदवून प्रथम क्रमांक पटकविला. द्वितीय स्थानावरील गौरव पवारने (४ गुण) मुलांमध्ये अव्वल पुरस्कार मिळविला.
परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मोनीक शाहने निर्णायक पाचव्या साखळी सामन्यात संयमी खेळ करून आदित्य बाजे (३.५ गुण) विरुद्ध १४ व्या मिनिटाला बरोबरी पत्करली आणि साखळी ४.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकविला. आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित कियारा खातुरीयाने (४ गुण) वेदांत शाहच्या (३ गुण) राजाला शह दिला आणि द्वितीय क्रमांकावर झेप घेत मुलींमध्ये अव्वल पुरस्कार जिंकला.