टीकाकारांना लाज वाटली पाहिजे - दुखावलेल्या विराटने सोडले मौन
By admin | Published: April 10, 2015 02:59 PM2015-04-10T14:59:04+5:302015-04-10T15:28:01+5:30
वर्ल्डकप सेमीफायनलमधील निराशाजनक खेळीमुळे चाहत्यांच्या टीकेचा धनी व्हावा लागलेल्या विराट कोहलीने आपले मौन सोडले असून चाहत्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात अवघी १ धाव काढून तंबूत परतलेला विराट कोहली व त्याची प्रेयसी अनुष्का शर्मावर चाहत्यांनी टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले होते. इतके दिवस या विषयावर काहीही न बोलणा-या विराटने अखेर आपले मौन सोडले आहे. ' चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी अतिशय दुखावलो गेलो आहे. त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली पाहिजे' अशी उद्विग्न प्रतिक्रिया विराटने दिली आहे.
'या घटनेमुळे मी खूप निराश झालो आहे. त्या सामन्यापूर्वी मी सातत्याने चांगली कामगिरी केली होती, मात्र फक्त एका सामन्यातील अपयशामुळे मला टीकेचे धनी व्हावे लागले. अशा घटनांमुळे तुम्ही लोकांवरील विश्वास गमावता. त्या सामन्यानंतर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय निराशजनक होत्या', असे सांगत कोहलीन त्याचे दु:ख व्यक्त केले आहे.
सेमीफायनलमध्ये कोहलीच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो सामना ९५ धावांनी गमावल्याने भारताचे अंतिम फेरीत पोचण्याचे स्वप्न भंगले होते.
क्रिकेट चाहत्यांनी जरी विराटवर टीकास्त्र सोडले असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू व बॉलिवूड सेलिब्रिटी विराट व अनुष्काच्या समर्थनार्थ पुढे आले. विराट-अनुष्काच्या नात्याचा आदर राखायला सांगत शांत रहा असे आवाहन सेलिब्रिटींनी केले होते.