CWG 2022 Day 2 Gururaja Wins Bronze : भारताचा वेटलिफ्टर गुरूराज पुजारी (पी. गुरूराजा) याने आज Commonwealth Games 2022 मध्ये दिवसभरात भारताला दुसरं मेडल मिळवून दिलं. गुरूराज पुजारीने ६१ किलो वजनी गटात एकून २६९ किलो वजन उचलले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. या आधी मराठमोळ्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्येच रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यापाठोपाठ आता गुरूराजनेही पदक कमाई केली.
गुरूराजाने ६१ किलो वजनी गटात सर्वप्रथम १४४ किलो वजन उचलून यशस्वी सुरूवात केली. क्लीन अँड जर्क प्रकारात त्याने आपला यशस्वी ठसा उमटवत पदकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्याच पहिल्या प्रयत्नाला मागे टाकले आणि १४८ किलो वजनाची उचल केली. त्यामुळे त्याला पदक मिळण्याच्या आशा अधिकच स्पष्ट होत गेल्या. अखेर तिसऱ्या प्रयत्नात गुरूराजाने १५१ किलो वजनाची उचल केली. त्यामुळे एकूण २६९ किलो वजन उचलून गुरूराजाने कांस्यपदकाची कमाई केली. हे भारताचे आजच्या दिवसातील वेटलिफ्टींग आणि सर्वच प्रकारांमधील मिळून दुसरे पदक ठरले. या स्पर्धेत मलेशियाच्या अझनिल बिन बिदीन मुहम्मद याने २८५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवलं. तर पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारू याने २७३ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली.
--
"मी माझे पदक माझ्या पत्नीला समर्पित करतो आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो. संकेतने रौप्य जिंकले आणि कांस्यपदक जिंकून मी भारतासाठी दुसरे पदक जिंकले याचा मला आनंद आहे. २६९ किलो वजनाची उचल करणे हा चांगला प्रयत्न असला तरी मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. मी काही दिवसांपूर्वी आजारी पडलो होतो, पण मी बरा झालो आणि माझं सर्वस्व पणाला लावून खेळलो. या विजयाचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. ते माझे स्वप्न होते", अशा भावना गुरूराज पुजारी याने व्यक्त केल्या.