कोरोना व्हायरसमुळे हातावर पोट असलेल्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक मजूर आपापल्या गावी परतत आहेत. पण, महाराष्ट्रातील गरीब कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तसाच कायम आहे. कोरोना व्हायरसचं हे संकट कधी दूर होईल? आयुष्याची गाडी कधी पूर्वपदावर धावेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालल्याचे दिसत आहे आणि त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या धावपटूवर उपासमारीची वेळ आली आहे. वडीलांना अर्धांगवायूचा झटका आणि त्यात लॉकडाऊमुळे आईवर बेरोजगारीची आलेली कुऱ्हाड यामुळे भारताच्या उदयोन्मुख धावपटू प्राजक्ता गोडबोले आणि तिच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तिच्याकडे एकवेळच्या जेवणाचेही पैसे नाहीत.
24 वर्षीय प्राजक्ता नागपूरच्या सिरासपेठ येथे एका झोपडीत आपल्या आई-वडीलांसह राहते. तिनं 2019मध्ये इटलीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात तिला 18:23.92 सेकंदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा होता, परंतु ती अपयशी ठरली. या वर्षाच्या सुरुवातीला तिनं टाटा स्टील भुवनेश्वर अर्ध मॅरेथॉनमध्ये 1:33:05 च्या वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
तिचे वडील विलाक गोडबोले सुरक्षारक्षक होते, परंतु त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तिची आई अरुणा जेवण बनवण्याचं काम करून महिन्याला 5 ते 6 हजार रुपये कमावते. पण, लॉकडाऊनमुळे लग्न कार्य होत नसल्यानं गोडबोले कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.
प्राजक्ता म्हणाली,''शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या मदतीवर आम्ही अवलंबून आहोत. ते आम्हाला तांदूळ, डाळ आणि काही वस्तू देत आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांचा प्रश्न सुटतो, परंतु पुढे काय मांडलंय याची कल्पना नाही. आमच्यासाठी लॉकडाऊन क्रूर ठरत आहे. मी सरावाचाही विचार करत नाही. अशा परिस्थितीत जगायचं कसं? लॉकडाऊननं आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.''
या परिस्थितीत नक्की काय करावं, कुणाकडे मदत मागावी हेही प्राजक्ताला कळेनासे झाले आहे. ''काय करावं हेच कळत नाही. आई-वडीलही काहीच करू शकत नाही. लॉकडाऊन लवकर संपावा यासाठी आम्ही केवळ प्रार्थना करत आहोत.''
मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार
Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!