Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:24 AM2020-03-26T02:24:13+5:302020-03-26T06:28:15+5:30
coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रकोपामुळे टोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याच्या आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीच्या निर्णयाचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने स्वागत केले. दुसरीकडे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल, अशी कबुलीदेखील दिली. असे असले तरी आॅलिम्पिकची नव्याने तयारी करण्याचा तसेच डावपेच आखण्याचा निर्धार आयओए तसेच क्रीडा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सर्वजण त्यांची आवश्यक मदत करणार असून भारतातील लॉक डाऊन संपल्यानंतर सर्वच महासंघांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.
दरम्यान, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानेदेखील आॅलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचे आणि संशोधित योजना आखण्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)
पॅरालिम्पिक समितीनेही केले स्वागत
नवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक समितीने टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे तयारीबाबत द्धिधा मन:स्थितीत असलेल्या खेळाडूंना दिलासा लाभेल, असे म्हटले आहे. पीसीआय महासचिव गुरुशरणसिंग यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर पीसीआय पुढील डावपेच आखेल, असे म्हटले आहे. अध्यक्ष दीपा मलिक यांनी याआधी खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे म्हटले होते.
‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जगभरातील खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंना यथायोग्य मदत करण्याचे मी आश्वासन देत आहे. सद्यस्थितीचा त्यांच्या तयारीवर परिणाम होणार नाही, याची ग्वाही देतो. खेळाडूंनी निराश होऊ नये. आम्ही याहून सर्वोत्कृष्ट तयारी करू आणि योजना आखू. भारत २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.’
-किरेन रिजिजू, क्रीडामंत्री