नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रकोपात आॅलिम्पिकचे आयोजन कसे? जीव वाचला तरच आॅलिम्पिक खेळू. आयुष्याची चिंता आधी, नंतरच आॅलिम्पिकचा विचार व्हावा,’ असे मत आॅलिम्पिकची तयारी करीत असलेला भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया याने व्यक्त केले आहे.सर्वसामान्य भारतीयांसारखा बजरंगदेखील कोरोनामुळे चिंताग्रस्त आहे. त्याने टोकियो लांबणीवर टाकण्याचा आग्रही सल्ला दिला आहे. जगात सर्वत्र आॅलिम्पिक आयोजनावरून चर्चेला ऊत आला आहे. अनेक देशांनी सद्य:स्थितीत आॅलिम्पिकचे आयोजन निर्धारित तारखांना करणे योग्य होणार नाही, असे मत व्यक्त करीत विरोध दर्शविला आहे. आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक परिषदेनेदेखील निर्धारित तारखांना आॅलिम्पिक होईलच याची खात्री नसल्याचे म्हटले आहे. बजरंग हा टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाची सर्वात मोठी आशा आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त असलेल्या बजरंगने एका मुलाखतीत सद्य:स्थिती पाहता आॅलिम्पिकचे आयोजन स्थगित व्हावे, अशी आग्रही मागणी केली.हा निर्णय केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जगातील सर्वच खेळाडूंसाठी सर्वोत्तम ठरेल. सर्वांसाठी सध्या कठीण काळ आहे. कोरोनापासून मानवजातीला कसे वाचविता येईल, याचाच विचार होण्याची गरज आहे,’असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)
Coronavirus : जीव वाचला तरच ऑलिम्पिक खेळू - बजरंग पुनिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:34 PM