नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर २४ जुलैपासून सुरु होणारी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. यामुळे आता खेळाडूंना एक वर्ष या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेसाठी प्रतीक्षा करावी लागणार असून प्रत्येक खेळाच्या प्रशिक्षकांनी आतापासूनच योजना आखण्यास सुरु केले आहे.जगभरामध्ये कोरोना विषाणूचे सावट पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) जपान सरकारसोबत चर्चा करुन अखेर आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर जगभरातील खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागतही केले. भारतीय नेमबाजीचे राष्ट्रीय प्रशिक्षक जसपाल राणा म्हणाले की, ‘या निर्णयामुळे नेमबाजांवर मोठा परिणाम होईल, खास करुन पहिल्यांदाच आॅलिम्पिक खेळणाऱ्या युवा खेळाडूंवर परिणाम होईल. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेसाठी तयारी करत असून आता कोणत्याही तक्रारीविना आम्हाला या निर्णयाचे पालन करावे लागेल.’ आतापर्यंत सुमारे ८० भारतीय अॅथलिट आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले असून आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा सुरु झाल्यानंतर यामध्ये आणखी संख्या वाढण्याची खात्रीही आहे.आॅलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा नेमबाजांकडून असून टोकियो २०२० आॅलिम्पिकसाठी विक्रमी १५ भारतीय नेमबाजांनी कोटा मिळवला. यामध्ये ८ पुरुष व ७ महिला नेमबाजांचा समावेश आहे. राणा पुढे म्हणाले की, ‘आयुष्य अमूल्य असून जे काही केले जात आहे, ते खेळाडूंच्या सर्वोत्तम हित गृहीत धरुनच केले जात आहे. तसेच हा निर्णय केवळ खेळाडूंसाठीच नसून संपूर्ण जगासाठी आहे.’याशिवाय ९ मुष्टियोध्यांनी आणि ९ धावपटूंनीही आॅलिम्पिक पात्रता गाठली आहे. मुष्टियुद्ध संघाचे प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी सांगितले की, ‘२०२१ साली होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच मी माझ्या योजनांवर पुन्हा काम करेन. पुढील पात्रता फेरी स्पर्धा कधी आहेत, याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. स्पर्धेसाठी १३ पैकी ९ वजनी गटातून आॅलिम्पिक तिकीट मिळवले असल्याने आम्हाला फारशी चिंता नाही.’दरम्यान अजूनही भारताकडे आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी असून याबाबत नीवा म्हणाले की, ‘नक्कीच ही अविश्वसनीय वेळ आहे. पात्रता स्पर्धेऐवजी मिळवलेला फॉर्म कायम राखण्यावर आमचा भर असेल आणि हीच आमची मुख्य योजना आहे.’त्याचवेळी, अॅथलेटिक्सचे राष्ट्रीय प्रशिक्षक पी. राधाकृष्णन नायर यांनी निराशा व्यक्त करताना, ‘आॅलिम्पिक स्पर्धा २०२२ पर्यंत स्थगित करायला पाहिजे होते,’ असे सांगितले. ते म्हणाले की, ‘प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या योजनांकडे पाहता आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर माझ्यामते अॅथलेटिक्ससाठी यंदाचे सत्र जवळपास संपुष्टात आल्यासारखे आहे. सप्टेंबर किंवा आॅक्टोबरच्या आधी आपल्या काही सुरु करता येईल, असे वाटत नाही. त्यामुळे २०२१ सालच्या आॅलिम्पिकसाठी तयार होण्यास ७-८ महिन्यांचा वेळ पुरेसा ठरणार नाही.’ (वृत्तसंस्था)माझ्यामते एक वर्षाची मिळालेला वेळ चांगला कालावधी आहे. यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीवर कोणताही नकारात्मक परिणाम होईल, असे मला वाटत नाही.- पुलेल्ला गोपीचंद,बॅडमिंटन प्रशिक्षक
Coronavirus : स्थगितीमुळे तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ, भारतीय प्रशिक्षकांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:34 AM