आॅकलंड : न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक वन-डे खेळणारा अनुभवी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीने मंगळवारी ५० षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारताना १८ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला. विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठण्याची चमकदार कामगिरी केल्यानंतर ३६ वर्षीय व्हेटोरीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली होती. व्हेटोरीने कसोटी व टी-२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली आहे. अंतिम लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारल्यानंतर मायदेशी परतल्यावर व्हेटोरीने वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. व्हेटोरी म्हणाला, ‘‘न्यूझीलंडसाठी ही माझी अखेरची लढत होती. विजय मिळविला असता तर आनंद झाला असता; पण मला संघ सहकाऱ्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही गेल्या सहा आठवड्यांत शानदार खेळ केला. अंतिम फेरी गाठणे अभिमानाची बाब आहे. ब्रेन्डन मॅक्युलम व माईक हेसन यांचा मी विशेष आभारी आहे. त्यांच्याकडून मला चांगले सहकार्य मिळाले. दुखापतीसोबत संघर्ष करीत पुनरागमन करताना अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो, हे मी कधीच विसरू शकत नाही.’’ वयाच्या १८ व्या वर्षी १९९७ मध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (वृत्तसंस्था)
डॅनियल व्हेटोरीची क्रिकेटमधून निवृत्ती
By admin | Published: March 31, 2015 11:22 PM