हॅन्डस्प्रिंग प्रकारात दीपाला जिंकायचेय राष्ट्रकुलचे सुवर्ण - दीपा करमाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:33 AM2017-08-11T01:33:47+5:302017-08-11T01:33:52+5:30
रिओ आॅलिम्पिकमधील शानदार कामगिरीमुळे प्रोदुनोव्हाची ओळख बनलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर ही आता ‘व्हॉल्ट आॅफ डेथ’च्याही पुढे ‘हॅन्डस्प्रिंग ५४०’ प्रकरात राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकण्यास उत्सुक आहे.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील शानदार कामगिरीमुळे प्रोदुनोव्हाची ओळख बनलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर ही आता ‘व्हॉल्ट आॅफ डेथ’च्याही पुढे ‘हॅन्डस्प्रिंग ५४०’ प्रकरात राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकण्यास उत्सुक आहे.
रिओमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपाच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली असल्याने ती सध्या कुठल्याच स्पर्धेत सहभागी झालेली नाही. एप्रिल महिन्यात शस्त्रक्रियेमुळे ती आशियाई स्पर्धा तसेच कॅनडात झालेल्या विश्व चॅम्पियनशिपला मुकली. आॅस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ती सज्ज होणार आहे. शुक्रवारी २४ वा वाढदिवस साजरा करणारी त्रिपुराची ही खेळाडू नवे तंत्र शिकत आहे. हॅन्डस्प्रिंगमधील ५४० डिग्री टर्न हे ते नवे तंत्र असून याद्वारेच राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकायचे आहे. हा कठीण प्रकार असला तरी प्रोदुनोव्हासारखा कठीण नाही, असे दीपाने सांगितले.
तंत्र बदलाचे कारण विचारताच दीपा म्हणाली,‘मला अलीकडे जखम झाली आहे. मी अधिक जोखीम पत्करू इच्छित नाही. माझे लक्ष्य २०२० टोकियो आॅलिम्पिक आहे. प्रोदुनोव्हा प्रकाराशिवाय मला हॅन्डस्प्रिंगमध्येही यश मिळवायचे आहे.’ प्रोदुनोव्हा तंत्रात निपुण असलेली दीपा जगातील पहिल्या पाच खेळाडूंपैकी एक आहे.
दीपाला आधीपासून दोन व्हॉल्ट येतात मी बेसिक सरावाद्वारे तिला नवे तंत्र शिकवित आहे. दोन महिन्यांनंतर कामगिरीचा आढावा घेऊ. हॅन्डस्प्रिंगमधून अधिक गुण मिळविले जाऊ शकतात, असे वाटल्यामुळेच पुढील पाच महिने दीपाला हॅन्डस्प्रिंगमध्ये सज्ज करण्यावर भर देणार आहे. महिला जिम्नॅस्टिकसाठी एकूण पाच व्हॉल्ट गट असतात. अंतिम फेरीतील पात्रतेसाठी दोन वेगळे व्हॉल्ट अवगत असणे अनिवार्य आहे.
- बिश्वेश्वर नंदी, कोच
दीर्घकाळ स्पर्धात्मक वातावरणापासून दूर राहिल्याने राष्टÑकुल स्पर्धेत कामगिरीवर विपरीत परिणाम होईल, ही शक्यता दीपाने फेटाळून लावली. ती म्हणाली,‘सरावाबाबत बोलाल तर मी स्पर्धात्मक तंत्र ओळखूनच झपाट्याने सराव करणार आहे.’
दीपाला स्वत:च्या आत्मचरित्राबद्दल विचाराताच ती म्हणाली, ‘हा निर्णय माझ्या कोचचा असेल.
ते म्हणतील तसेच मी करणार आहे. माझा आणि त्यांचा अशाप्रकाराचा संबंध आहे.’