राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत दिव्या काकरान पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 03:24 AM2021-02-01T03:24:12+5:302021-02-01T03:24:38+5:30
Wrestling News : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला.
आग्रा : काही महिने आधी कोविड १९ पॉझिटिव्ह असलेली दिव्या काकरान हिला रविवारी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ६८ किलो गटात पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशच्या रजनीविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला. रजनीने नंतर रौप्यपदकाची कमाई केली; तर हरियाणाच्या अनिताने सुवर्ण तर दिल्लीच्या रोनक गुलिया आणि रेल्वेच्या रितू मलिक हिने कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या नंदिनी हिने ५३ किलो गटात सुवर्णपदक मिळविले; तर दिल्लीच्या ममता राणी हिने रौप्यपदक पटकावले.
मणिपूरच्या पी. विद्याराणी आणि मध्यप्रदेशच्या पूजा जाट हिने कांस्य मिळविले. रेल्वेच्या सरिता हिने ५९ किलोगटात सुवर्णपदक पटकावले; तर रौप्यपदक हरयाणाच्या संजू देवीला मिळाले. कांस्यपदक दिल्लीच्या नेहा आणि हरियाणाच्या अंजली हिने पटकावले. रेल्वेची एक अन्य पहेलवान निशा हिने ६५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली; तर रौप्यपदक राजस्थानच्या मोनिकाने तर कांस्यपदक पंजाबच्या जसप्रीत कौर आणि रेल्वेच्या निक्कीने जिंकले.रेल्वेने ७६ किलोगटातही दबदबा राखला. किरण हिने सुवर्ण, हिमाचल प्रदेशच्या रानी हिने रौप्य पटकावले.