माद्रिद : जगातील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल (राफा), माजी विजेता ब्रिटनचा अँडी मरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. जोकोविचने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या रॉबर्टाे बतिस्ता अगुत याचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-१ ने पराभव केला. तर नदालने अमेरिकेच्या सॅम कॅरी याच्यावर ६-४, ६-२ ने मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ब्रिटनचा अव्वल खेळाडू अँडी मरे याने तिसऱ्या फेरीतील सामन्यात जाईल्स सिमोनचा ६-४, ६-२ ने पराभव केला. तीन वर्षांनंतर पहिल्यांदा माद्रिद ओपन खेळत असलेल्या जोकोविचने सत्रातील ३० वा विजय नोंदवला. विजयानंतर जोको म्हणाला, रॉबर्टाेने उत्कृष्ट खेळ केला. एकावेळी पहिल्या सेटमध्ये त्याने २-२ अशी बरोबरी साधली होती. मात्र मी प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदण्यात यशस्वी ठरलो. त्यानंतर शेवटपर्यंत सेटवर वर्चस्व राखले.’’ अन्य सामन्यात, नदालने कॅरीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. नदालने संथ सुरुवात केल्यानंतर आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. आता अंतिम आठमध्ये तो पोर्तुगालच्या जोओ सोसोविरुद्ध खेळणार आहे.
जोकोविच, राफेल नदाल, मरे सुसाट!
By admin | Published: May 07, 2016 1:30 AM