नवी दिल्ली : आयपीएलच्या दहाव्या पर्वात भारताचा कर्णधार विराट कोहली लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. याचा अर्थ तो चॅम्पियन्समध्ये चमकदार खेळी करणार नाही, असा नाही. विरोधी संघांनी त्याला सहजरीत्या घेण्याची जोखीम पत्करू नये. कोहलीला सहजरीत्या घेणे प्रतिस्पर्धी संघांसाठी नुकसानदायक ठरू शकेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी याने व्यक्त केले आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीविषयी मत प्रदर्शित करताना हसी म्हणाला, ‘कोहली विश्वदर्जाचा खेळाडू आहे. या स्पर्धेत तो अपयशी ठरेल, असा ज्या संघांचा समज असेल त्यांना कोहलीकडून नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोहलीसारखा खेळाडू अधिक वेळ शांत राहू शकत नाही, याची मला खात्री आहे. विराट हा जागतिक क्रिकेटला स्वत:चा स्तर दाखविण्यास आसुसलेला असेल. भारत चॅम्पियन आहे. कोहली कदाचित अपयशी ठरला तरी त्याच्या कामगिरीचा परिणाम संघाच्या वाटचालीवर होणार नसल्याचे हसीने सांगितले.’हसी म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये होत आहे. अशावेळी पहिल्या सामन्यापासून आत्मविश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे.’ भारतीय फलंदाजांनी चेंडू जितका उशिरा खेळता येईल तितका तो खेळावा, असा सल्लादेखील हसीने दिला आहे. माझ्या मते फलंदाजांनी चेंडू अधिक उशिराने खेळावा. आॅस्ट्रेलियात चेंडू एकसारखा उसळी घेतो. त्यामुळे चेंडूच्या रेषेत येऊन टोलविणे शक्य होते. इंग्लंडमध्ये याऊलट स्थिती आहे.’ बर्मिंघम, कार्डिफ आणि ओव्हलमध्ये खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहील. या स्पर्धेत फिरकीची भूमिका निर्णायक ठरेल, असा तर्क हसीने काढला आहे.
कोहलीला ‘लाईटली’ घेऊ नका : हसी
By admin | Published: May 27, 2017 12:43 AM