‘अमेरिकन ओपन’ला मिळाली नवी सम्राज्ञी! एम्मा राडूकानूला ग्रॅण्डस्लॅमचे ऐतिहासिक विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:25 AM2021-09-13T05:25:50+5:302021-09-13T05:26:22+5:30

ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा राडूकानूने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घातली.

emma raducanu won the historic Grand Slam title pdc | ‘अमेरिकन ओपन’ला मिळाली नवी सम्राज्ञी! एम्मा राडूकानूला ग्रॅण्डस्लॅमचे ऐतिहासिक विजेतेपद

‘अमेरिकन ओपन’ला मिळाली नवी सम्राज्ञी! एम्मा राडूकानूला ग्रॅण्डस्लॅमचे ऐतिहासिक विजेतेपद

Next

न्यूयॉर्क : ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा राडूकानूने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घातली.  ५३ वर्षांच्या इतिहासात या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच ब्रिटिश महिला खेळाडू ठरली आहे. तसेच पात्रता फेरीचा अडथळा पार करीत विजेतपद पटकावणारी ती टेनिस जगतातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.

दोन प्रतिभावान किशोरवयीन टेनिसपटूंमध्ये झालेल्या अंतिम फेरीच्या या सामन्यात एम्मा राडूकानूने अमेरिकेच्या लेला फर्नांडिसचा ६-४, ६-३ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करीत आक्रमक सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेटच्या सहाव्या गेममध्ये राडूकानूने लेलाची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. यावेळी लेलाने चांगला प्रतिकार करीत ही आघाडी कमी करण्याच प्रयत्न केला; पण अखेर राडूकानू पहिला सेट ६-४ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ५-३ आघाडीवर असताना राडूकानू फटका मारण्याच्या नादात कोर्टवर पडली. यात तिच्या पायाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. मात्र ट्रेनरच्या मदतीने दुखापतीवर उपचार घेत ती पुन्हा उभी राहिली आणि दोन ब्रेक पॉइंट वाचवत ऐतिहासिक जेतेपदावर सुवर्णाअक्षरांनी नाव  कोरले.

या स्पर्धेच्या सुरुवातीला कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या राडूकानूने स्पर्धेत एकही सेट न गमवता हे विजेतेपद पटकावण्याची किमया केली. अंतिम फेरीपर्यंतच्या या प्रवासात या दोघींनीही अनेक मोठे उलटफेर केले. आपल्या वेगवान खेळाच्या जोरावर अनेक दिग्गजांना या दोघींनी आश्चर्यचकित केले. मात्र अंतिम फेरीच्या सामन्यात राडूकानू काकणभर सरस ठरली.

राडूकानूची मानांकनात मोठी झेप 

पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य स्पर्धेसाठी  पात्र ठरलेल्या राडूकानूचे मानांकन हे साधे पहिल्या १००च्या घरातही नव्हते. जागतिक क्रमवारीत १५०व्या क्रमांकावरील खेळाडू म्हणून तिने या स्पर्धेची सुरुवात केली होती. अनेकांप्रमाणे तिच्याही स्वत:कडून फारशा अपेक्षा नसल्यामुळे पहिला सामना होण्याआधीच तिने परतीचे विमान तिकीट काढून ठेवले होते. मात्र कोणाच्याही  ध्यानीमनी नसताना तिने एक-एक पाऊल चढत विजेतेपद पटकावले. या पराक्रमामुळेच ती जागतिक क्रमवारीत १५० व्या स्थानावरून थेट २३ व्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे.

- राडूकानूच्या या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी इंग्लंडसुद्धा सज्ज होते. म्हणूनच हा सामना संपूर्ण इंग्लंडच्या टेलिव्हिजवर फ्री टू एअर म्हणजेच नि:शुल्क दाखवण्यात आला.

- हा एक शानदार सामना होता. राडूकानू तुला खूप खूप शुभेच्छा. ज्या असामान्य कौशल्य आणि निर्धाराचे तू अंतिम सामन्यात प्रदर्शन केले त्याचा आम्हाला गर्व आहे. -बोरिस जॉन्सन, पंतप्रधान

एवढ्या कमी वयात मिळवलेले हे विजेतेपद तुझ्या अथक परिश्रमाचे आणि त्या प्रति असलेल्या प्रतिबद्धतेचे एक मोठे उदाहरण आहे. - राणी एलिझाबेथ
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऑनएअर मॅच सुरू असताना ट्विट करतो आहे. काय प्रदर्शन होते, काय विजय होता, काय खेळाडू आहे, अद्भूत. - गॅरी लिकेनर, इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार

निर्धाराने खेळणार

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळालेली लेला फर्नांडिस म्हणाली की, अमेरिकावर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. एक अमेरिकी असल्याने मला याबाबत प्रचंड दु:ख तर आहेच. मात्र या घटनेनंतर न्यूयॉर्कने केलेल्या निर्धारामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. मला अंदाज आहे की या पराभवामुळे तुम्हीसुद्धा खूप निराश झाले असाल. पण मला विश्वास आहे की या  निर्धाराने मी सुद्धा पुढे येईल आणि पुढील स्पर्धांमध्ये आपला खेळ उंचावेल. -लेला फर्नांडिस
 

Web Title: emma raducanu won the historic Grand Slam title pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस