नूर सुल्तान (कझाखस्तान) : ‘मॅटवर पुरेसा वेळ न घालविता मोठ्या स्पर्धेला सामोरे जाणे घोडचूक ठरली. नव्या दमाने पुनरागमन करण्यासाठी अधिक जोमाने सराव करावा लागेल,’ असे मत अनुभवी मल्ल सुशील कुमार याने व्यक्त केले. जागतिक कुस्तीत प्रतिआव्हान न देता सहज पराभव स्वीकारल्याची कबुलीही सुशीलने दिली आहे.लंडन २०१२ व २०१९ च्या जागतिक स्पर्धेदरम्यान ७ वर्षांत सुशील केवळ सात स्पर्धा खेळला, हे विशेष. जकार्ता आशियाई स्पर्धेत तो सहज पराभूत होताच ३६ वर्षांचा हा मल्ल आव्हान सादर करण्यास सक्षम आहे का, याविषयी शंका उपस्थित झाली होती. जागतिक स्पर्धेतून टोकियो आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुशीलने अलीकडे रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला.सुशील म्हणाला, ‘मी पराभूत झालो पण चांगला खेळलो. जकार्ताच्या तुलनेत येथे माझ्या खेळात वेग होता. या स्पर्धेतून दमदार पुनरागमन करीत असल्याचे संकेत देऊ इच्छित होतो. येथे उपस्थित विदेशी प्रशिक्षकांचे माझ्याबाबतचे मत असेच काहीसे होते. सध्या माझ्यात ऊर्जा कमी असून बचाव कमकुवत आहे. सराव व व्यायामाच्या जोरावर उर्जा कमविण्यास किमान ९० दिवस लागतील, असे प्रशिक्षकाचे मत आहे.’
आव्हान देण्यात अपयशी ठरलो - सुशील कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:21 AM