नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदाचा अर्ज दाखल, भारतीय आॅलिम्पिक संघटना निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:04 AM2017-11-28T02:04:41+5:302017-11-28T02:04:41+5:30
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या सभेमध्ये ‘आयओए’च्या नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात येणार आहे.
बात्रा यांनी तीन सेटमध्ये आपला अर्ज भरला असून, यातील एक प्रस्ताविक असून एक अर्ज समर्थनक आहे. बत्रा यांचे नाव प्रस्तावित करण्यामध्ये ‘आयओए’चे महासचिव राजीव मेहता यांचा समावेश असून, खजिनदार अनिल खन्ना यांनी बत्रा यांना समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे, याआधी खन्ना यांना ‘आयओए’ अध्यक्षपदासाठी दावेदार मानले जात होते. त्याच वेळी, बत्रा यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठीही तीन सेटमध्ये आपला अर्ज भरला आहे.
आयओएचे माजी सरचिटणीस राजीव मेहता यांनी पुन्हा सरचिटणीस पदासाठी आणि भाजपा राष्ट्रीय परिषदेचे माजी सदस्य सुधांशू मित्तल यांनी उपाध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.
मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विविध पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. यानंतर, संध्याकाळी ५ वाजता इच्छुक पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. दरम्यान, बत्रा यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. ‘आयओए’च्या वतीने एका अधिकाºयाने सांगितले की, ‘२०१२ आणि २०१४ साली कार्यकारी परिषदेचे सदस्य राहिलेले उमेदवारही अध्यक्षपद आणि महासचिव पदाची निवडणूक लढवू शकतात.’
बत्रा यांनी २०१२ ते २०१४ या काळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून, ते कार्यकारी परिषदेचे सदस्य नव्हते. तसेच, मावळते अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी याआधीच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)