आज रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचा अंतिम सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:10 AM2020-02-16T03:10:39+5:302020-02-16T03:11:04+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ । २५वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित २५व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात बुधवारपासून कबड्डीच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. रविवारी या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचा अंतिम सामना खेळला जाणार असून, संपूर्ण राज्याचे अंतिम सामन्याकडे लक्ष लागले आहे.
शुक्रवारच्या फेरीत बँक आॅफ बडोदा, न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण या संघांनी शहरी पुरुष व्यावसायिक गटाच्या बाद फेरीत प्रवेश केला. शहरी व्यावसायिक पुरुषांच्या ‘ब’ गटात बँक आॅफ बडोदाने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र बँकेचे आव्हान २३-२१ असे मोडून काढत, या गटात अग्रक्रम मिळवून बाद फेरी गाठली. नितीन देशमुख, जितेश पाटील यांनी जोरदार सुरुवात करीत विश्रांतीला १७-११ अशी आघाडी घेतली, पण विश्रांतीनंतर महाबँकेच्या प्रवीण रहाटे, राकेश गायकवाड यांना सूर सापडल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली, पण सामन्याच्या निर्णयात फरक पडला नाही. गटात उपविजेतेपद मिळवत, महाबँकेनेदेखील बाद फेरी गाठली.
महिलांच्या बाद फेरीनंतर साखळी सामन्यांना सुरुवात झाली होती. ‘इ’ गटात जे.जे. हॉस्पिटलने स्नेहविकासला ३९-२० असे नमविले. पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या जे.जे.ने उत्तरार्धातदेखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मिळविला. वैष्णवी चव्हाण, सविता कावळे यांना या विजयाचे श्रेय जाते. स्नेह विकासच्या रिया तावडे, आस्था कदम बºया खेळल्या. ‘क’ गटात अश्विनी शेवाळे, सायली कचरे, राजश्री पवार यांच्या चढाई-पकडीच्या भन्नाट खेळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने वर्ध्याच्या युवक ग्रामीण मंडळाचा ३७-१८ असा पाडाव केला. मध्यांतराला २२-१० अशी विजयी संघाकडे आघाडी होती. युवक ग्रामीणकडून रक्षा भलये बरी खेळली.
असा रंगला सामना...
‘अ’ गटात नाशिकच्या रचना स्पोटर््सने महात्मा फुलेला ४३-०९ असे नमवित आगेकूच केली. ‘अ’ गटात ठाणे मनपाने आकाश स्पोटर््सवर ४४-०८ असा विजय मिळविला. ‘क’ गटात अमरहिंदने युवा ग्रामीणचा ४७-१० असा पाडाव केला. या सलग दुसºया पराभवाने युवा ग्रामीनचा बाद फेरी गाठण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागला होता. ‘फ’ गटात स्वस्तिक मंडळाने श्रीराम पालघरवर ३३-२१ अशी मात केली. पूर्वार्धात ०७-१० अशा पिछाडीवर पडलेल्या स्वस्तिकने जोरदार कमबॅक करीत हा विजय मिळविला.
शनिवारीच्या फेरीत पुरुष शहरी या गटात आठ संघ खेळले.
याशिवाय ग्रामीण संघातून आठ तर महिला संघातून १८ संघ खेळविले गेले. हे सामने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या संघांनी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली खेळी खेळून प्रेक्षकांचे मन जिंकले.