नवी दिल्ली : गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने अखेर आपली गाडी विजयी मार्गावर आणताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ७ विकेटने धुव्वा उडविला. दिल्लीच्या १६२ धावांचा पाठलाग करताना पुणेकरांनी ५ चेंडू राखून १६६ धावा फटकाविल्या. अजिंक्य रहाणेने अखेरपर्यंत नाबाद राहत शानदार अर्धशतकासह पुण्याला विजयी केले.फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पुणेकरांनी यजमान दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. अडखळत्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी मोक्याच्या वेळी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरे दिल्लीने ७ बाद १६२ अशी मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना पुण्याने आक्रमक सुरुवात केली. रहाणे आणि नवा सलामीवीर उस्मान ख्वाजा यांनी आक्रमक सुरुवात करताना ५९ धावांची सलामी दिली. अमित मिश्राने ख्वाजाला बाद करून ही जोडी फोडली. या वेळी ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा दिल्लीला फटका बसला. तब्बल चारवेळा त्यांनी बळी मिळविण्याच्या संधी गमावल्या व त्याचा अचूक फायदा पुणेकरांनी उचलला. ख्वाजा २७ चेंडंूत ३० धावा काढून परतला. यानंतर सौरभ तिवारी (१८ चेंडंूत २१), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२० चेंडंूत २७) व थिसारा परेरा (५ चेंंडंूत नाबाद १४) यांनी रहाणेला चांगली साथ दिली. रहाणेने अखेरपर्यंत टिकून राहत ४८ चेंंडंूत ७ चौकारांसह ६३ धावा फटकाविल्या. याआधी, आक्रमक सुरुवात केलेल्या दिल्लीला तिसऱ्याच षटकात युवा रिषभ पंतच्या रूपाने पहिला धक्का बसला. अशोक दिंडाने त्याचा त्रिफळा उडविला. यानंतर संजू सॅमसन- करुण नायर यांनी संघाला सावरले. स्कॉट बोलंडने संजूला बाद केल्यानंतर दहाव्या षटकात करुणही रजत भाटीयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. संजूने १७ चेंडंूत ३ चौकारांसह १७ धावा काढल्या, तर करुणने २३ चेंडंूत ५ चौकारांसह ३२ धावा चोपल्या. या वेळी पुणेकर वर्चस्व गाजविणार असे दिसत होते.ड्युमिनी, सॅम बिलिंग्स व कार्लोस ब्रेथवेट यांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला दीडशेचा पल्ला गाठून दिला. ड्युमिनीने ३२ चेंडूंत ३४ धावा केल्या.बिलिंग्सने १५ चेंडूंत एक चौकार व २ षटकारांसह २४ धावा आणि ब्रेथवेटने ८ चेंडूंत ३ षटकारांची आतषबाजी करीत २० धावा कुटल्या. स्कॉट बोलंड व रजत भाटीया यांनी प्रत्येकी २ बळी घेताना दिल्लीला रोखण्याचा प्रयत्न केला.संक्षिप्त धावफलक :दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १६२ धावा (जेपी ड्युमिनी ३४, करुण नायर ३२, सॅम बिलिंग्स २४; रजत भाटीया २/२२, स्कॉट बोलंड २/३१) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : १९.१ षटकांत ३ बाद १६६ धावा (अजिंक्य रहाणे नाबाद ६३, उस्मान ख्वाजा ३०; इम्रान ताहीर २/२६)
...अखेर पुणे जिंकले!
By admin | Published: May 06, 2016 5:11 AM