फोगाट, साक्षीने जिंकले कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 03:16 AM2019-04-27T03:16:49+5:302019-04-27T03:17:06+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले.
शियान : आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे साक्षी मलिकनेही ६२ किलो वजनी गटात कांस्य जिंकल्याने भारतीय पथकाचे आव्हान सुवर्ण पदकाविना संपुष्टात आले.
विनेशने जकार्ता आशियाई क्रीडा ५० किलो गटात सुवर्ण जिंकल्यानंतर वरच्या वजन गटात उतरण्याचा निर्णय घेतला. विश्व कुस्ती महासंघाने टोकियो आॅलिम्पिकमध्ये ५० ऐवजी ५३ किलो वजन गट असा बदल केला. विनेश जपानची मायू मुकेदाकडून पराभूत झाली. मायूने तांत्रिक वर्चस्वाद्वारे १०-० अशी बाजी मारली. नंतर मुकेदाने अंतिम फेरीत धडक देताच विनेशला रेपेचेजची संधी मिळाली. यावेळी विनेशने चायनीज तैपईच्या जो चियला ६-० असे लोळवले. कांस्य पदकाच्या प्ले आॅफ लढतीत विनेशने कियानयू पांग हिच्यावर ८-१ अशी सरशी साधली. साक्षीने पात्रता फेरीत व्हिएतनामच्या थी माय हानला नमविले. उपांत्यपूर्व फेरीत मात्र ती जपानची युकाको कवाईकडून पराभूत झाली. कवाई फायनलमध्ये जाताच साक्षीने संधीचा लाभ घेत कोरियाची जियी चोईला नमवून कांस्यपदक प्ले आॅफमध्ये धडक दिली.(वृत्तसंस्था)