जीबी बॉक्सिंग: कविंदर सिंगचा सुवर्ण ‘पंच’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:50 AM2019-03-11T04:50:37+5:302019-03-11T04:50:53+5:30
चार खेळाडूंनी पटकावले रौप्य
नवी दिल्ली : कविंदर सिंग बिष्ट (५६ किलो) याने सुवर्ण, तर शिव थापा आणि अन्य तीन खेळाडूंनी रौप्य पदकाची कमाई करत फिनलॅँडच्या हेलसिंकीमध्ये झालेल्या ३८ व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकाविला. तीन वेळचा आशियाई पदक विजेता थापा (६० किलो) याच्यासोबतच गोविंद साहनी (४९ किलो), राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो) व दिनेश डागर (६९ किलो) यांनी रौप्य पदकाची कमाई केली.
भारतीयांमध्ये ५६ किलोच्या अंतिम फेरीत बिष्ट व हुसमुद्दीन समोरासमोर आले होते. दोन्ही बॉक्सर सेना क्रीडा नियंत्रण बोर्डाचे खेळाडू आहेत. दोघांना एकमेकांचे तंत्र चांगलेच माहीत आहे. यावेळी बिष्टने डोळ्यावर कट लागल्यानंतरही बाजी मारली. फ्लायवेट गटात विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरी गाठणारा बिष्ट येथे बँथमवेटमध्ये आल्यानंतर त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.
दुसरीकडे, साहनीने थायलंडच्या थितीसान पनमोदच्याविरुद्ध मजबूत सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत विजय मिळवला. मात्र पुढच्या दोन फेरीत पनमोदला पंचांचे गुण मिळाले आणि त्याने ३-२ असा विजय मिळवला. विश्व चॅम्पियनशिपचा माजी कांस्यपदक विजेता आसामच्या थापाला स्थानिक दावेदार अर्सलान खातेवला १-४ कडून पराभव पत्करावा लागला.
गेल्या वर्षीचा इंडिया ओपनचा रौप्यपदक विजेता डागरला उपांत्य फेरीत डोळ्याला दुखापत झाली होती. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता इंग्लंडच्या पॅट मेकोरमॅक खूप आक्रमक होता. त्याने तिसऱ्या फेरीत काही सेकंदात पंचांचा निर्णय आपल्या बाजूने फिरवला. (वृत्तसंस्था)