योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय; 'कुस्ती'ला दत्तक घेतलं, करणार १७० कोटी खर्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:14 PM2021-08-26T17:14:07+5:302021-08-26T17:15:26+5:30
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. टोक्योतून परतलेल्या या पदकविजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर देशात क्रीडा संस्कृतीची पायामुळं आणखी खोल होताना दिसत आहेत. ओदिशा सरकारप्रमाणे आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारनं कुस्ती या खेळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना योगी सरकारनं एकूण ४२ कोटींच्या बक्षिसांचे वाटप केले होते. ( UP government adopts Indian wrestling till 2032 Olympics)
उत्तर प्रदेश सरकारनं ऑलिम्पिक २०३२पर्यंत कुस्तीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंग यांनी दिली आहे. त्यांनी ओदिशा सरकारकडून प्रेरणा घेत हा निर्णय घेतला आहे. ''ओदिशासारखे लहान राज्य हॉकीला एवढा मोठा पाठिंबा देत असतील, तर मग उत्तर प्रदेश का नाही. हे खूप मोठं राज्य आहे आणि कुस्तीला नेहमी सपोर्ट करत आले आहे. यासाठी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली,''असे सिंग यांनी सांगितले.
२०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रतीवर्ष १० कोटी खर्च करण्यात यावेत, त्यानंतर २०२८ पर्यंत प्रती वर्ष १५ वर्षा आणि अंतिम टप्प्यात म्हणजे २०३२ पर्यंत प्रतीवर्ष २० कोटी कुस्तीच्या विकासासाठी खर्च करावीत, असा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारकडे ठेवला असल्याचेही सिंग यांनी सांगितले. WFI नं २०१८मध्ये टाटा मोटर्ससोबत प्रिन्सिपल स्पॉन्सर्स म्हणून करार केला आहे.
यूपी सरकारकडून खेळाडूंचा गौरव...
सुवर्णपदक विजेत्या नीरजला दोन कोटींचा धनादेश देण्यात आला. याशिवाय रवि दहिया व मीराबाई चानू या रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड कोटी आणि पी व्ही सिंधू, लवलिना, बजरंग यांच्यासह पुरुष हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी बक्षीस दिलं गेलं. टोक्योत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं बक्षीसही योगी सरकारनं दिले. यासह मीराबाई चानूचे प्रशिक्षक उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद येथील विजय शर्मा यांना १० लाख, पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकांना २५ लाख व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख दिले गेले. महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १० लाख दिले गेले. कुस्तीपटू दीपक पूनिया व गोल्फपटू अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख दिले गेले. टोक्योत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशमधील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.