डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:22 PM2019-03-18T12:22:43+5:302019-03-18T12:23:40+5:30

कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे.

The grand sports festival started in Dewan; enjoy Kho-Kho, Kabbadi, Football | डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार

डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार

Next

डेरवण : कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खो खो, कबड्डी, फुटबॉल, लंगडी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, नेमबाजी, अॅथलेटीक्स, जलतरण अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगत आहेत. राज्यभरातून ४ हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडूंना १२ लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत. 

डेरवण युथ गेम्समध्ये असलेल्या क्रीडा प्रेरणा व्यासपीठावर खेळांशी संबंधित वेगवेगळी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये डॉक्टर भारती शर्मा आणि फिजिओथेरपिस्ट मेघना पालखाडे यांची खास उपस्थिती होती. सृष्टी अत्खारे यांनी त्यांची मुलाखत घेतली. मेघना यांनी, खेळ सुरु करण्यापूर्वी करायचे आणि नंतर करायचे व्यायामप्रकार यांची माहिती खेळाडूंना दिली. डॉक्टर शर्मा यांनी खेळांमध्ये होणाऱ्या दुखापतीनविषयी विषयी माहिती दिली. सूज आणि फ्रॅक्चऱ यातला फरक कसा ओळखावा, हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्याची काय काळजी घ्यावी याविषयी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. 

झोप आणि आहार यांचे खेळाडूंच्या आयुष्यातील महत्व त्यांनी विशद केले. तसेच सरावाला किती महत्व आहे हेदेखील त्यांनी पटवून दिले. डेरवण हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या श्वेता यांनी प्रथमोपचाराची माहिती सांगितली. मैदानावर खेळाडूला दुखापत होत तेव्हा त्याची काळजी कशी घ्यावी, तसेच दुखापतीमधून बरे झाल्यावरही पूर्ण तपासणी केल्याशिवाय मैदानात उतरू नये, अन्यथा दुखापत वाढण्याची शक्यता असते, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी उपस्थितीत असलेल्या खेळाडूंनी आपल्या मनातील शंका त्यांना विचारल्या. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

फ्लाईट लेफ्टनंट संजय देशमुख हे खेळाडूंना संरक्षण दलात असलेल्या संधी याविषयी मार्गदर्शन करतील. आहारतज्ञ स्वाती भोसकी खेळाडूंच्या आहाराबाबत माहिती देतील. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू, डॉ. नताशा कानविंदे डोपिंगबाबत सांगतील. नेतृत्व कौशल्य या विषयावर शर्मिला कानविंदे मार्गदर्शन करतील.
 

Web Title: The grand sports festival started in Dewan; enjoy Kho-Kho, Kabbadi, Football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.