- अयाझ मेमन
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने गेल्या आठवड्यात कट्टरतेच्या चष्म्यातून क्रीडा क्षेत्रात विष कालवू इच्छिणाऱ्यांच्या तोंडावर चपराक मारली. मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करताना राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी यापेक्षा अधिक समर्पक संदेश असू शकत नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेकीत २३ वर्षांच्या नीरजने अनेक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून योद्ध्याच्या शैलीत सुवर्ण जिंकले. या कामगिरीबद्दल जितके कौतुक व्हावे तितके थोडे आहे. पण काही हितसंबंधी गटाने स्वत:च्या कपट कारस्थानासाठी नीरजला वादात ओढण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने नीरजचा वापर करीत या प्रसंगाला भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंग देण्याचाही प्रयत्न झाला.
नीरजने एका मुलाखतीत म्हटले होते की भालाफेक करण्याआधी मी पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी नदीम अर्शद याच्याकडून माझा भाला मागितला होता. भालाफेक प्रकारात ही सामान्य बाब आहे. तथापि भारतातील द्वेष ब्रिगेडला आयता मुद्दा मिळाला. सोशल मीडियावर या घटनेचा अतिरेक करण्यात आला. दोन्ही खेळाडूंना एकमेकांविरोधात उभे करण्याचा प्रयत्न झाला. खरेतर नीरज आणि नदीम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षांपासून मित्रत्वाच्या भावनेतून वावरतात. प्रतिस्पर्धी असले तरी नदी, नीरजला आदर्श मानतो.
शत्रुत्व आणि द्वेषाची आग भडकवू इच्छिणाऱ्यांनी मात्र नदीमने नीरजची लय बिघडविण्यासाठीच हेतुपुरस्सरपणे भाला घेतला होता, असे वृत्त पसरविले. आपल्याला उगाच वादात ओढले जात आहे, हे नीरजच्या ध्यानात येताच त्याने हिंदीत व्हिडिओ प्रसारित केला. नीरजने ट्वीट केले, ‘मी सर्वांना विनंती करीन की कृपया माझ्या वक्तव्याचा वापर तुमच्या स्वार्थासाठी व प्रचारासाठी पुढे करू नका. खेळ आपल्याला एकत्र व एकोप्याने राहण्यास शिकवतो... ’
नीरजच्या क्रीडावृत्तीचे आणि धाडसाचे इतर खेळाडूंनीही स्वागत केले. यावर विचार मांडण्याची त्यांना प्रेरणा लाभली. साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी, ‘खेळाडू हे खेळाडू असतात. आम्ही मैदानात विराधक असू मात्र मैदानाबाहेर बंधुत्वाने वागतो. खेळ आपल्याला द्वेष बाळगण्यास शिकवित नाहीत, संघटित होण्यास आणि एकोपा राखण्याची शिकवण देतो,’ असे मत मांडले.